त्र्यंबकेश्वर मंदिराच्या वेळेवरून वाद सुरूच
By admin | Published: September 17, 2015 12:03 AM2015-09-17T00:03:01+5:302015-09-17T00:05:16+5:30
तिहेरी त्रांगडे : परप्रांतीय भाविकांत नाराजी
नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा पर्वणीच्या पार्श्वभूमीवर दररोज हजारो भाविकांची त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी गर्दी होत असताना मंदिर व्यवस्थापनाने घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे भाविक व व्यवस्थापन कर्मचाऱ्यांमधील वाद विकोपाला पोहोचले असून, धक्काबुक्की व लोटालोटीचे प्रकार घडून वातावरण कलुषित होत आहे. मंदिर व्यवस्थापन, पोलीस यंत्रणा व जिल्हा प्रशासन या तिघांच्या तीन भूमिका असल्यामुळे तासन् तास रांगेत उभे राहूनही भाविकांना दर्शन न घेता माघारी परतावे लागत आहे.
कुंभमेळ्याच्या दुसऱ्या पर्वणीच्या आदल्या दिवसापासूनच त्र्यंबकेश्वरला लाखो भाविकांची गर्दी होत असून, शेवटची शाही पर्वणी २५ सप्टेंबर रोजी असल्याने तत्पूर्वीच त्र्यंबकेश्वरला भेट देऊन कुशावर्तात स्रान व त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्याकडे भाविकांचा कल आहे. दुपारपासूनच दोन किलोमीटरपर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. मात्र सायंकाळी सहा वाजेनंतर ध्वनिक्षेपकावरून भाविकांना रांगेत उभे न राहण्याच्या सूचना दिल्या जात असून, त्यासाठी रात्री आठ वाजता मंदिर बंद होणार असल्याचे कारण पुढे केले जात आहे. विशेष म्हणजे मंदिर बंद होण्याची सूचना पोलिसांकडून केली जात असून, त्याची साधी कल्पना मंदिर व्यवस्थापन वा विश्वस्तांना नसल्याचे बोलले जात आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून भाविकांना दर्शनासाठी मज्जाव करणाऱ्या पोलिसांच्या कृतीविषयी विश्वस्त मंडळाच्या सदस्यांकडे भाविकांनी तक्रार केली असता त्यांनीही याबाबत अनभिज्ञता दर्शविली. श्रीमती ललिता शिंदे यांनी भाविकांच्या होणाऱ्या छळाबद्दल जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली असता, जिल्हाधिकाऱ्यांनी मंदिर रात्री बारा वाजेपर्यंत दर्शनासाठी खुले ठेवण्यास हरकत नसल्याचे आश्वासन त्यांना दिले; परंतु जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश पोलीस जुमानत नसून विश्वस्त मंडळाचीही आडमुठेपणाची भूमिका आहे. परिणामी चार ते पाच तास रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांना दर्शन न घेताच, परतावे लागत आहे. दोन दिवसांपूर्वी त्र्यंबक भेटीवर येऊन गेलेले आरोग्यमंत्री दीपक केसकर यांच्याकडेही तक्रार करण्यात आली असून, त्यांनी यासंदर्भात थेट मुख्यमंत्र्यांशी बोलणी करण्याचे आश्वासन दिले होते, त्याचाच भाग म्हणून की काय नाशिकच्या धर्मदाय आयुक्तांना या वादात लक्ष घालण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते. देशभरातून येणाऱ्या भाविकांना कुशावर्ताबरोबरच श्री त्र्यंबकेश्वर भगवानच्या दर्शनाची आस लागून असताना, त्यांना दर्शन नाकारून प्रशासन त्र्यंबकेश्वरमध्ये उगीचच गर्दी वाढवत असल्याचा आरोपही केला जात आहे. मंदिर व्यवस्थापन व पोलीस यांच्या या कृतीमुळे स्थानिक ग्रामस्थही नाराज झाले आहेत.