त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टचे कर्मचारी संपावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 2, 2019 06:08 PM2019-03-02T18:08:41+5:302019-03-02T18:09:00+5:30
मागण्यांवर ठाम : महाशिवरात्रीच्या तोंडावर उपसले हत्यार
त्र्यंबकेश्वर : नाशिक जिल्ह्यातील महत्वाचे तीर्थक्षेत्र आणि ज्योर्तिलिंग असलेल्या त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या १३६ कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. दरम्यान, कर्मचाऱ्यांनी महाशिवरात्रीच्या तोंडावर संपाचे हत्यार उपसल्याने देवस्थान ट्रस्टने पर्यायी उपाययोजना तयार ठेवली आहे.
त्र्यंबकेश्वर देवस्थान कर्मचारी संघटना सी.आय.टी.यु.शी संलग्न असून संघटनेचे सरचिटणीस सिताराम ठोंबरे यांनी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला संपाबाबत नोटीस दिली आहे. कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी शनिवार (दि.२) पासून संप पुकारला आहे. त्यात प्रामुख्याने, सर्व कर्मचा-यांना समान वेतन मिळावे, साप्ताहिक सुटी मिळावी, महिला कर्मचा-यांना कायद्यानुसार प्रसुती रजा मिळावी व स्वच्छतागृहाची सोय करण्यात यावी, कर्मचाºयांना सुटी मंजुर व नामंजुर करण्याचे अधिकार असलेले विश्वस्त कार्यालयात उपलब्ध असावेत, कायद्यानुसार ८ तासांपेक्षा जास्त असलेल्या जादा कामाचा मोबदला दुप्पट दराने मिळावा, जेवणाच्या जागेची सोय व वेळ उपलब्ध करु न द्यावी, महागाईनुसार पाच हजार रु पयांची वेतनवाढ मिळावी आदी मागण्यांचा समावेश आहे.
बचत गटाच्या माध्यमातून काम
विश्वस्त मंडळाने संपाच्या पार्श्वभूमीवर महिला बचत गटाच्या २५ महिला, पुरोहित संघाचे पदाधिकारी व सदस्य तसेच तुंगार ट्रस्टचे कर्मचारी आदींच्या मदतीने काम चालू केले आहे. सोमवारी (दि.४) महाशिवरात्र उत्सव असल्याने त्र्यंबकेश्वर मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी उसळणार आहे. त्यामुळे ६० पोलिस कर्मचारी व ७० गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तासाठी बोलविण्यात आले असल्याची माहिती विश्वस्त तृप्ती धारणे यांनी दिली आहे.