त्र्यंबकेश्वरला खेळाडूंचा सत्कार
By admin | Published: December 10, 2015 11:08 PM2015-12-10T23:08:32+5:302015-12-10T23:10:00+5:30
नगरपालिका : महाराष्ट्र राज्य संघात क्रिकेटपटूंची उल्लेखनीय कामगिरी
त्र्यंबकेश्वर : फैजाबाद येथे झालेल्या राज्यस्तरीय १९ वर्षाच्या आतील क्रिकेट स्पर्धेत येथील क्रिकेटपटूंनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. अजिंक्य जोशी, अजिंक्य शुक्ल, शुभम जुंद्रे या खेळाडूंचा त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतर्फे सत्कार करण्यात आला.
त्र्यंबकेश्वरमध्ये क्रिकेटसह कुस्तीचेही शौकीन आहेत. येथे दरवर्षी कुस्त्यांच्या स्पर्धा घेण्यात येतात. त्र्यंबकेश्वरमधील पहिलवानही राज्यस्तरापर्यंत पोहोचले आहेत. येथील प्रसिद्ध मल्ल शांताराम बागुल यांची कन्या मानसी हिनेही परभणी येथे पार पडलेल्या राजीव गांधी खेल अभियानअंतर्गत राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत महिला गटात यश प्राप्त करून त्र्यंबकेश्वरचे नाव गाजविले. यासर्व खेळाडूंचा सत्कार त्र्यंबकेश्वर नगरपालिकेतर्फे नगराध्यक्ष अनघा फडके यांच्या हस्ते झाला.
सत्कार सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. क्रिकेटचे मैदान गाजविणारे तिन्ही खेळाडूंचे प्रशिक्षक, अंजनेरी येथील क्रीडाशिक्षक माधव चव्हाण यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. नगराध्यक्ष यांनी यावेळी शहरातील खेळाडूंसाठी लवकरच मैदान उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे यासाठी शहरात क्रीडांगण नाही. ही उणीव लक्षात घेता नगराध्यक्षांनी दिलेले आश्वासन पूर्ण होईल, असा आशावाद अन्य नेत्यांनी भाषणातून व्यक्त केला. सत्कारार्थींना त्र्यंबकराजाची मूर्ती भेट म्हणून देण्यात आली. नगरसेवक धनंजय तुंगार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी राजेश दीक्षित, सुरेश गंगापुत्र, शांताराम बागुल, गिरीश जोशी आदिंनी मनोगत व्यक्त केले. उपनगराध्यक्ष संतोष कदम यांनी आभार मानले. (वार्ताहर)