त्र्यंबकेश्वर कुंभमेळा शासनाकडून दुर्लक्षित
By Admin | Published: December 23, 2014 10:18 PM2014-12-23T22:18:17+5:302014-12-23T22:18:44+5:30
शासनाने साधू-महंतांशी चर्चा न केल्यास जंतरमंतरवर उपोषण करणार
त्र्यंबकेश्वर : कुंभमेळा सात महिन्यांवर येऊन ठेपला आहे. अद्याप एकही काम पूर्ण झाले नसल्याची खंतही साधूंनी व्यक्त केली. जी कामे सुरू आहेत ती समाधानकारक होत नसल्याची तक्रारही बैठकीत केली. ही सर्व कामे पूर्ण होण्यासाठी घाईघाईने कामे केली जात आहेत. पर्यायाने कामांचा दर्जाही घसरत आहे. या कामांचा दर्जा न सुधारल्यास कामे बंद करावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
उत्तर भारतातील कुंभनगरीच्या मंत्र्यांचा महाराष्ट्र सरकारच्या मंत्र्यांनी जरुर आदर्श घ्यावा. राजनाथसिंह, उमाभारती, आजम खान आदि मंत्र्यांनी आपापल्या राज्यातील कुंभमेळ्यांचे केलेले नियोजन कौतुकास्पद ठरले आहे. वास्तविक त्या राज्यांमध्येही भाजपा सरकार आहे. महाराष्ट्रातदेखील भाजपा सरकारच असताना हा विरोधाभास का, असा सवाल येथे झालेल्या दहा आखाड्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत साधू-महंतांनी उपस्थित केला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्वामी सागरानंद सरस्वती होते. सर्वच साधू सरकारवर एकप्रकारे तुटून पडले. महाराष्ट्रात आतापर्यंत जी-जी सरकारे आलीत त्यांच्यापेक्षा सध्याच्या सरकारची कामगिरी खराब असल्याचे साधू-महंतांनी एकमुखाने सांगितले.
येथील आनंद तपोनिधी पंचायती आखाड्यात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीला येथील दहाही आखाड्यांचे स्थानिक पदाधिकाऱ्यांव्यतिरिक्त मुख्यालयांमधून वरिष्ठ साधू-महंत आले होते. बैठकीत अनेक मुद्दे चर्चिले गेल. ज्या मुख्यमंत्र्यांना अगर संपर्कमंत्र्यांना कुंभमेळ्याबद्दल ज्ञान नाही अशा मंत्र्यांना पदावर राहण्याचा हक्क नाही, असे सांगून जुना आखाड्याचे महंत हरिगिरीजी यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. महंत नरेंद्रगिरीजी म्हणाले, मध्यंतरी निवडणुकीमळे सिंहस्थ कामात शिथिलता आली. मात्र निदान त्यावेळेस तरी मंत्री, प्रशासनाने लक्ष घालणे गरजेचे होते. सर्वच साधु पोटतिडीकेने बोलत होते. यावेळी नरेंद्रगिरीजी, आशिषगिरीजी, हरिगिरीजी, प्रेमगिरीजी, उमाशंकर भारती, महंत शंकरानंद सरस्वती , महंत धनराजगिरी, समुद्रगिरीजी, महंत रणधीरपुरीजी, दुर्गानंद ब्रह्मचारी, महानिर्वाणी रामगिरीजी महाराज, महंत उदयगिरीजी, प्रेमानंदजी, विचारवासनी, राजिंदरसिंह तसेच ठाणापती (जुना) महंत पिनाकेश्वरजी, श्यामराव गंगापुत्र, नगरसेवक अभिजित काण्णव, विष्णू दाबाडे आदि उपस्थित होते. शेवटी साधूंनी पुनश्च एकदा चारही शंकराचार्य (चार पीठाचे) यांच्यासह जंतरमंतर (दिल्ली) येथे आमरण उपोषणाचा इशारा दिला. जर महाराष्ट्र शासनाच्या मंत्र्यांनी-मुख्यमंत्र्यांनी आमच्याशी चर्चा न केल्यास त्र्यंबकेश्वरला दुर्लक्षित ठेवल्यास नियोजित उपोषण अधीक तीव्र केले जाईल, असे यावेळी ठरविण्यात आले. (वार्ताहर)