ब्रम्हगिरीजवळ सुरुंग स्फोटाची त्र्यंबकेश्वर पालिकेकडून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:14 AM2021-05-27T04:14:50+5:302021-05-27T04:14:50+5:30
त्र्यंबकेश्वर : गंगा गोदावरीचे उगमस्थान असलेला ब्रम्हगिरी व गंगाद्वार पहाडाचे कुणी लचके तोडत असेल तर ही बाब खपवून घेतली ...
त्र्यंबकेश्वर : गंगा गोदावरीचे उगमस्थान असलेला ब्रम्हगिरी व गंगाद्वार पहाडाचे कुणी लचके तोडत असेल तर ही बाब खपवून घेतली जाणार नाही, असा सज्जड इशारा त्र्यंबकेश्वचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून ब्रम्हगिरीच्या पायथ्याला ब्लास्टींग सुरु असून डोंगराला हादरे बसत आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दरम्यान, मेरीच्या अहवालाची प्रतीक्षा लागून आहे.
तळेगाव शिवारातील सुमारे दहा एकर जागेवर सद्यस्थितीत सपाटीकरण व सुरूंग लावून दगड बाजूला करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे ब्रह्मगिरीला धोका उत्पन्न होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जागा मालकाच्या म्हणण्यानुसार जेथे काम सुरू आहे, तेथून १ कि.मी. अंतरावर ब्रम्हगिरी आहे. तर मेटघेरा ग्रामपंचायतीचे क्षेत्रफळ जवळपास २ कि.मी. अंदाजे असावे, असे तेथील ग्रामसेवकांनी सांगितले. त्यामुळे सुरुंगाच्या धक्क्याची झळ वर पर्यंत पोहोचू शकते, असा दावा केला जात आहे. दरम्यान, संबंधित जागा मालकाकडून याठिकाणी फळबाग विकसित केली जाणार असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, ब्रह्मगिरीला धोका उत्पन्न होण्याबाबत मेरीने सर्वेक्षण केले असून त्याचा अहवाल अद्याप आलेला नाही. तोपर्यंत काम बंद ठेवण्यात आल्याचे जागा मालकाने सांगितले. मात्र, या प्रकरणाची नगर परिषदेनेही गंभीर दखल घेतली असून नगराध्यक्ष लोहगावकर यांनी याबाबत संबंधितांवर कायदेशीर कारवाईचे संकेत दिले आहेत.