गुरुपौर्णिमेसाठी त्र्यंबकेश्वर सज्ज !
By Admin | Published: July 7, 2017 11:27 PM2017-07-07T23:27:08+5:302017-07-07T23:36:32+5:30
त्र्यंबकेश्वर : येत्या रविवारी गुरुपौर्णिमा उत्सव असल्याने शिष्य गुरुचरणी नतमस्तक होण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे येतील
त्र्यंबकेश्वर : येत्या रविवारी व्यास पौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमा उत्सव असल्याने महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारताच्या विविध भागातील असंख्य शिष्य आपल्या गुरुचरणी नतमस्तक होण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे येतील, तर त्र्यंबकेश्वरमधील अनेक रहिवासी भक्तगण वेगवेगळ्या गावी गुरु स्थानी आपल्या गुरुंचा आशीर्वाद घेण्यासाठी सज्ज झाले आहेत.
भारतातील वेद, पुराणे, उपनिषदे आदींचे जनक व्यास महर्षी होय. महाभारताची निर्मिती करून जगाला भगवद्गीतेच्या माध्यमातून ज्ञान उपलब्ध करून दिले. त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी वर्षातून एक दिवस व्यास पौर्णिमा साजरी केली जाते. आपणही आपल्या गुरुप्रति कृतज्ञता व श्रद्धा व्यक्त करण्यासाठी गुरु चरणी नतमस्तक होऊन गुरु स्थानी जाऊन त्यांची यथासांग पूजा करून त्यांना वंदन करून आपल्या कुवतीनुसार दक्षिणा, भेटवस्तू देतो. त्यांचा आशीर्वाद घेऊन गुरुप्रसाद ग्रहण करून आपापल्या स्थानी परत येतो. तसेच पेगलवाडी फाट्यावर महंत बिंदूजी महाराज यांच्या आश्रमातदेखील मोठा सोहळा आयोजित करण्यात येतो.
त्र्यंबकेश्वर येथे प.पू. माधव महाराज घुले यांचाही आश्रम सुरू झाला आहे. त्र्यंबक गावातही अनेक गुरुस्थाने, अनेक ठिकाणी मठ, आश्रम आहेत. त्या ठिकाणीदेखील अनेक शिष्य येत असतात. ब्रह्मवृंदाच्या घरीदेखील वेदविद्या शिकून गावोगावी पौरोहित्य करणारेही आपल्या गुरुकडे येत असतात. एकंदरीत, गुरु पौर्णिमेची येथे जय्यत तयारी सुरू आहे.