त्र्यंबकेश्वरचा नदीकाठ पाण्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2019 06:10 PM2019-07-11T18:10:02+5:302019-07-11T18:10:13+5:30
तिसऱ्यांदा पूर : संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत
त्र्यंबकेश्वर : शहर व परिसरात संततधार पावसामुळे पुन्हा एकदा शहरात पूरसदृश स्थिती निर्माण झाली. गोदावरी नदीसह निलगंगा व म्हातार ओहळाला पुर आल्याने नदीकाठच्या घरांमध्ये पाणी घुसले. बुधवारी रात्रभर पावसाचा जोर सुरू होता.
शहरात आतापर्यंत तिसऱ्यांदा पुर आला आहे. गेल्या रविवारी (दि.७) आलेल्या पुरामुळे शहर जलमय झाले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. हा पूर ओसरत नाही तोच बुधवारपासून सुरू झालेल्या पावसाने पुन्हा एकदा शहरातील काही भाग पाण्यात गेला. तेली गल्लीत निलगंगेचे पाणी नेहमीच घुसत असते. त्यामुळे संपुर्ण तेलीगल्लीतील रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या घरांना कायम पुराच्या पाण्याशी सामना करावा लागतो. संपुर्ण मेनरोड वरील निवासी घरे व दुकाने आदिंचा तळमजला पाण्यात जात असतो. दरम्यान, बुधवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे त्र्यंबकेश्वर शहरात काही भागात पुन्हा एकदा पाणी घुसल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. नदीकाठ परिसरातील अनेक दुकाने व घरांमध्ये पाणी घुसले होते. दुपारनंतर पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पूर ओसरायला सुरूवात झाली. सोमवारी (दि.८) सकाळी आठ वाजेपर्यंत अंबोली धरण जवळपास ९० टक्के भरले होते. बेझे वगळता अंबोली-अहल्या धरण ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर जलपुजन करण्याचा मानस नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर यांनी बोलुन दाखविला.