त्र्यंबकेश्वरला चांदीचा पंचमुखी मुखवटा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 12:57 AM2019-12-16T00:57:32+5:302019-12-16T00:58:03+5:30
त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला औरंगाबाद येथील उद्योजक शेखर चंपालाल देसरडा आणि परिवाराकडून १५ किलो वजनाचा चांदीचा मुखवटा प्रदान करण्यात आला. या निमित्ताने एका समारंभाचे आयोजन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फेकरण्यात आले
त्र्यंबकेश्वर : येथील त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टला औरंगाबाद येथील उद्योजक शेखर चंपालाल देसरडा आणि परिवाराकडून १५ किलो वजनाचा चांदीचा मुखवटा प्रदान करण्यात आला. या निमित्ताने एका समारंभाचे आयोजन त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फेकरण्यात आले होते. यापूर्वीही देसरडा परिवाराकडून त्र्यंबकराजाच्या दैनंदिन त्रिकाल पूजेसाठी चांदीच्या भांड्यांचा सेट दान करण्यात आला होता.
हा पंचमुखी चांदीचा मुखवटा विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष न्या. एम. एस. बोधनकर यांनी खास समारंभात स्वीकारला. आपल्या अध्यक्षीय भाषणात न्या. बोधनकर यांनी देसरडा परिवाराचे आभार मानले. यावेळी विश्वस्त संतोष कदम यांनी मुखवटा तयार करण्यामागची पूर्वपीठिका सांगितली. मुखवटा बनविणारे मैंद बंधू व सचिन पाचोरकर यांचा देसरडा यांच्या हस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष यादवराव तुंगार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे अध्यक्ष प्रशांत गायधनी यांनी केले. सूत्रसंचालन अतुल तथा गिरीश जोशी यांनी केले. या कार्यक्रमास देसरडा परिवार, दिलीप तुंगार, संतोष दिघे, पंकज भुतडा, संतोष कदम, तृप्ती धारणे, उल्हास आराधी, प्रभावती तुंगार, मधुकर कडलग, पंकज धारणे, सुरेश पाडेकर, डॉ. दिलीप जोशी, कैलास भुतडा, अमर सोनवणे व महिलावर्गाची लक्षणीय उपस्थिती होती.
शिखरावरील पंचलिंगाचे प्रतीक म्हणून पंचमुखी मुखवटा
विश्वस्त सत्यप्रिय शुक्ल यांनी पंचमुखी मुखवटा का याबाबत विश्लेषण केले. त्र्यंबकेश्वर हे सह्याद्री पर्वताच्या कुशीत वसलेले आहे. या पर्वतरांगेत ब्रह्मगिरी व गंगाद्वार हे दोन पर्वत आहेत. ब्रह्मगिरीवर गोदावरीचा उगम झाला. ब्रह्मगिरीच्या उंच शिखरावर पंचलिंग आहेत. ही पंचलिंगे म्हणजे वामदेव, अघोर, इशान, सद्योजात व तत्पुरु ष आहेत. या पंचलिंगाचे प्रतीक म्हणून पंचमुखी मुखवटा तयार करण्यात आला.