त्र्यंबकेश्वर उपबाजार समिती लवकरच कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2020 04:13 AM2020-12-06T04:13:58+5:302020-12-06T04:13:58+5:30
त्र्यंबकेश्वर : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्र्यंबकेश्वर येथील उपबाजार आवार व तेथे होणाऱ्या अद्यावत इमारतीमधील सुमारे ३५ व्यावसायिक ...
त्र्यंबकेश्वर : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्र्यंबकेश्वर येथील उपबाजार आवार व तेथे होणाऱ्या अद्यावत इमारतीमधील सुमारे ३५ व्यावसायिक गाळ्यांमध्ये लवकरच शेतमाल व अन्य व्यवसायांची मोठ्या प्रमाणात उलाढाल होणार असल्याची माहिती नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक संपतराव सकाळे यांनी दिली.
त्र्यंबकेश्वर उपबाजार आवाराचे काम कोरोना व लाॅकडाऊनकाळात ठप्प झाले होते. सुमारे साडेसात कोटी रुपयांचा खर्च असलेले काम भव्य व मोक्याच्या जागी असल्याने त्याचा फायदा होणार आहे. एका बाजूला नाशिक-जव्हार-पालघर- डहाणू ते थेट गुजरात महामार्ग, तर त्र्यंबकेश्वर शहरापासून दोन फर्लांग अंतरावर असलेले हे उपबाजार वाहतुकीच्या दृष्टीने रहदारीलाही अडथळा ठरणार नाही. येथे थेट जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भाजीपाला उत्पादक तसेच महिरावणी, तळेगाव, दुडगाव, गणेशगाव, नाशिक ही तालुक्यातील गावे त्र्यंबकलाच माल आणणे पसंत करतील. मोठे काम असल्याने सध्या पायाभरणीचे काम सुरू आहे. या मार्केटमुळे त्र्यंबकेश्वर शहराच्या विकासात मोठी व उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे. सध्या हे काम आधुनिक मशीनरीजच्या साहाय्याने वेगात सुरू असून, काम प्रगतिपथावर आहे.