त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 01:20 PM2020-03-18T13:20:34+5:302020-03-18T13:21:13+5:30
त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिगांपैकी आद्य ज्योतिर्लिग श्री त्र्यंबकेश्वर मंदिर बुधवारपासून (दि.१८) पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे.
त्र्यंबकेश्वर : बारा ज्योतिर्लिगांपैकी आद्य ज्योतिर्लिग श्री त्र्यंबकेश्वर मंदिर बुधवारपासून (दि.१८) पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय देवस्थान ट्रस्टने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुट्ट्यांच्या कालावधीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मंदिर दर्शनार्थींकरिता बंद ठेवण्यात येणार आहे. कारण गर्दी कुठेही होता कामा नये याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने बैठकीचे आयोजन करून कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर संसर्गजन्य आजार पसरू नये म्हणून दि. १८ पासून त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांच्या दर्शनाकरिता बंद राहील. या दरम्यान त्र्यंबकराजाच्या नित्य नियमित पूजा मात्र होतील, अशी माहिती देण्यात आली आहे. बैठकीला नगराध्यक्ष पुरूषोत्तम लोहगावकर, पंचायत समितीचे वरिष्ठ अधिकारी, मुख्याधिकारी निकम, लॉजिंग व हॉटेल व्यावसायिक, देवस्थानचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येथील नारायण नागबली, कालसर्प शांती, त्रिपिंडी श्राद्ध आदी धार्मिक विधींचे बुकिंग रद्द करण्यात आले आहे, अशी माहिती मंदार पाटणकर, कमलाकर अकोलकर यांनी दिली.