त्र्यंबकेश्वर मंदिराची वेळ एक तासाने वाढविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2021 11:16 PM2021-11-28T23:16:05+5:302021-11-28T23:16:50+5:30
त्र्यंबकेश्वर : दिवाळी संपून तीन आठवड्यांचा काळ लोटला आहे. तरीही त्र्यंबकेश्वरमध्ये होणारी भाविक-पर्यटकांची गर्दी सुरूच आहे. नाताळ व सरत्या वर्षामुळे यापुढेही गर्दी अशीच राहणार आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर मंदिराची वेळ आता एक तासाने वाढविण्यात आली आहे. रात्री ९ वाजेपर्यंत मंदिर खुले राहणार आहे.

नुकतेच त्र्यंबकेश्वर मंदिर उघडले असल्याने भाविकांची त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी एकच गर्दी होत आहे. खासगी वाहने, प्रवासी टॅक्सी व नाशिक मनपाची सिटीलिंक सेवा त्यामुळे भाविकांची दळणवळणाची सोय होत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप खासगी टॅक्सी, सिटी लिंक सेवा यांच्या चांगलाच पथ्यावर पडला आहे. दरम्यान, त्र्यंबकेश्वर येथे बससेवा सुरू झाली असून त्यामुळे खासगी प्रवासी सेवेला चाप बसणार आहे. संपामुळे खासगी प्रवासी वाहतूकदारांनी अव्वाच्या सव्वा भाडे वसुली केली होती. सध्या गावातील दर्शनीय स्थळे, कुशावर्त तीर्थ, गोदावरी उगमस्थान गंगाद्वार आदी ठिकाणी गर्दी दिसत आहे. मंदिरे खुली झाल्याने त्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांनाही ९ वाजेपर्यंत परवानगी दिलेली आहे. गर्दी होत असताना भाविकांकडून मात्र कोविडच्या नियमांचे उल्लंघन होताना दिसत आहे. त्यातच नवीन विषाणूचा धोका वाढल्याने भाविकांकडून अधिक काळजी घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
देणगी दर्शनावर भर
मोफत धर्मदर्शन पूर्व दरवाजाने सुरू आहे तर देणगी दर्शन उत्तर महादरवाजाने होते. २०० रुपये देऊन देणगी दर्शन घेण्यासाठी भाविकांची प्रचंड रांग असते. व्हीआयपी दर्शन सेवा आता बंद केल्याने लोकांचा कल २०० रुपये भरून का होईना, दर्शन घेण्याकडे आहे.