त्र्यंबकेश्वर : गुरुवारी निवृत्तिनाथ यात्रा चंदनाची उटी उगाळण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:36 AM2018-04-08T00:36:56+5:302018-04-08T00:36:56+5:30
त्र्यंबकेश्वर : येत्या गुरुवारी (दि.१२) रोजी मिनी निवृत्तिनाथ यात्रा म्हणून समजली जाणारी उटीची वारी यात्रा आहे.
त्र्यंबकेश्वर : येत्या गुरुवारी (दि.१२) रोजी मिनी निवृत्तिनाथ यात्रा म्हणून समजली जाणारी उटीची वारी यात्रा आहे. पौष वद्य एकादशीची निवृत्तिनाथ महाराज यात्रा ऐन कडाक्याच्या थंडीत असते, तर उटीची वारी यात्रा रणरणत्या उन्हात अर्थात वरु थिनी एकादशीला असते. या दोन्हीही यात्रांना येणे म्हणजे भाविक वारकऱ्यांची जणू कसोटीच असते ! उटीच्या वारीच्या यात्रेसाठी संत निवृत्तिनाथ महाराज समाधी संस्थान सज्ज झाले आहे. वारकरी भाविकांच्या सोयी-सुविधांसाठी मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू झाले आहे. दोन महिन्यांपूर्वी जीर्णोद्धाराचा भूमिपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला होता. मंदिर जीर्णोद्धारासाठी भाविकांच्या सहकार्याची अपेक्षा आहे, असे समाधी संस्थानचे अध्यक्ष हभप संजय महाराज धोंडगे, सचिव पवन भुतडा, त्र्यंबकराव गायकवाड, पुंडलिकराव थेटे, रामभाऊ मुळाणे, जयंत गोसावी, अविनाश गोसावी, सोपान गोसावी, ललिता शिंदे, धनश्री हरदास, जिजाबाई लांडे, पंडितराव कोल्हे, त्र्यंबक नगर परिषद मुख्याधिकारी डॉ. चेतना केरुरे यांनी केले आहे. संत निवृत्तिनाथ महाराज यांनी अवघ्या ३६व्या वर्षी श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे संजीवन समाधी घेतली. त्यावेळेस खोदलेल्या गारमध्ये ते समाधी अवस्थेत बसलेले होते. उन्हाळ्यातील दाहकतेचा त्रास संजीवन निवृत्तिनाथांना होऊ नये या भावनेने वरुथिनी एकादशीच्या दिवशी चंदनाच्या उटीचा लेप समाधीला चढवितात. यासाठी चैत्र वद्य षष्ठीपासून सात दिवस ही उटी अर्थात चंदनाची खोडं उगाळण्याचे कार्य वारकरी महिला भाविक करतात. यावेळी अभंग, भजन, ओव्या म्हणत उटी उगाळतात. त्या उगाळण्यासाठी असलेल्या पाण्यात द्रवरूपी चंदन, अष्टगंध, थंडगार वाळा अशी वनौषधी टाकून समाधीला चढविण्यासाठी उटी तयार केली जाते. सातव्या दिवशी दुपारी २ वाजता समाधीवर उटीचा लेप चढवितात. तिच उटीची वारी होय. रात्री उटी उतरवून तिचे द्रवरूपी पाण्यात रूपांतर करून भाविकांवर शिंपडली जाते, किंवा वाटप करतात. ही उटी जमलेले भाविक भक्तिभावाने धन्य होऊन आपापल्या घरी जातात.
तीन क्विंटलची उटी
निवृत्तिनाथ महाराजांची समाधी तर संजीवन आहे. या संजीवन समाधीत निवृत्तिरायाचे वास्तव्य असल्याची भाविकांची श्रद्धा आहे. सर्व वारकरी, भाविक यांना पुरेल अशी साधारण अडीच ते तीन क्विंटल उटी तयार करण्यात येते. पूर्वी एक क्विंटलपर्यंत चंदनामध्ये भागत असे. दिवसेंदिवस भाविकांची संख्या वाढत असल्याने उटी तयार करण्यासाठी जास्त चंदन वगैरे उटीचे साहित्य मागवावे लागते. या यात्रेसाठी सर्वच यंत्रणा सज्ज झाल्या आहेत.