त्र्यंबकेश्वरच्या कष्टकऱ्यांना आले ‘अच्छे दिन’
By admin | Published: August 3, 2015 11:18 PM2015-08-03T23:18:09+5:302015-08-03T23:19:38+5:30
त्र्यंबकेश्वरच्या कष्टकऱ्यांना आले ‘अच्छे दिन’
त्र्यंबकेश्वर : येथील कष्टकरी महिला, तरुणांना सध्या आखाडे, अन्नछत्रांमध्ये कामे व भरपूर मोबदला मिळवण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यामुळे एकप्रकारे त्यांना दोन महिन्यांसाठी ‘अच्छे दिन’ आले आहेत.
येथील विविध आखाडे, शिबिर, अन्नछत्र सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी गजबजू लागली असून, लोकसंख्या वाढल्याने विविध कामांसाठी माणसांची गरज भासू लागली आहे. आखाडा, अन्नछत्रांमध्ये स्त्री-पुरुषांना ५०० ते १००० रुपये रोज दिला जात असून, त्याबदल्यात त्यांना स्वयंपाकाची, जेवणाची भांडी घासणे, साधू-महंतांचे, भक्तांचे, पूजेचे कपडे धुणे, साफसफाई करणे, भाज्या चिरून देणे, डाळ-तांदूळ धुवून देणे, धान्य निवडून देणे, पुऱ्या लाटून देणे आदि कामे करावी लागत आहेत. तरुण मुले आखाड्यातील महंतांना पूजेसाठी सामान आणून देणे, किराणा आणून देणे, भोजनावळींमध्ये वाढण्यास मदत करणे आदि कामे करत आहेत.
या कष्टकरी महिलांना चहा, नाष्टा यांसह दोन वेळच्या जेवणाचाही लाभ मिळत असून, कुटुंबीयांसाठी अन्नपदार्थ नेण्याची मुभाही दिली जात आहे. नुकत्याच झालेल्या गुरुपौर्णिमेला येथील जवळपास सर्वच आखाड्यांमध्ये भंडाऱ्यांचे आयोजन केले होते. त्यावेळी कामगारांची आवश्यकता भासली. स्वयंपाकात गती असणाऱ्या तरुणांना अन्नछत्र, भंडाऱ्यांमध्ये स्वयंपाकाचीही कामे करण्याची संधी मिळाली. येथील आचाऱ्यांचे पाककौशल्य पाहून आखाड्यातील व्यवस्थापकांनी दोन महिन्यांसाठीचे कंत्राटच आचाऱ्यांना देऊन त्यांच्याशी करार करून घेतला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे आखाड्यांमध्ये अनेक कामे मिळतात. त्यामुळे दोन पैसे जोडण्याची ही संधी आहे. यासाठी आम्ही कष्ट करून रोजगाराची संधी साधणार आहोत.
- सुमन फाळके, बबाबाई घागरे
दोन महिने थोडे-अधिक कष्ट करावे लागणार असले तरी आर्थिक लाभही महत्त्वाचा आहे. या निमित्ताने साधू-महंतांची सेवा करण्याची संधी मिळते आणि पैसेही जोडता येतात. - मंगल झोले, त्र्यंबकेश्वर