त्र्यंबकेश्वर, येवला, नांदगावला मिळाले नवे 'रेंजर', इगतपुरी रेंज पोरकी; हरसूल, सुरगाण्यालाही प्रतीक्षा कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2021 11:21 PM2021-08-05T23:21:01+5:302021-08-05T23:21:25+5:30
मागील दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून हरसूल या अतिसंवेदनशील वनपरिक्षेत्राचा कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोसे चालविला जात आहे. गुजरात सीमावर्ती भागातील या वनपरिक्षेत्राची जबाबदारी कधी नाशिक तर कधी पेठ आरएफओच्या खांद्यावर टाकण्यात आली.
नाशिक : वनविभागातील पूर्व, पश्चिम वनविभागाच्या त्र्यंबकेश्वर, येवला, नांदगाव या रेंजचा कारभार अतिरिक्त म्हणून अन्य आरएफओ यांच्याकडे सोपविलेला होता. नुकतेच प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी (वनबल प्रमुख) काढलेल्या वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदली आदेशाने या तीनही रेंजला स्वतंत्र 'रेंजर' (आरएफओ) लाभले; मात्र हरसूल, इगतपुरी, ननाशी आणि सुरगाणा वनपरिक्षेत्राला अद्यापही स्वतंत्र वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांची प्रतीक्षा कायम आहे.
मागील दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून हरसूल या अतिसंवेदनशील वनपरिक्षेत्राचा कारभार हा प्रभारी अधिकाऱ्यांच्या भरोसे चालविला जात आहे. गुजरात सीमावर्ती भागातील या वनपरिक्षेत्राची जबाबदारी कधी नाशिक तर कधी पेठ आरएफओच्या खांद्यावर टाकण्यात आली. सध्या पेठ आरएफओकडे हरसूलचा अतिरिक्त कारभार आहे. त्याअगोदर नाशिक आणि त्यापूर्वी त्र्यंबकेश्वर आरएफओ यांच्याकडे होता. सुरगाणा वनपरिक्षेत्रदेखील प्रचंड संवेदनशील आणि गुजरात सीमेला लागून आहे, तरीदेखील मागील वर्षभरापासून या रेंजला स्वतंत्र अधिकारी मिळू शकलेला नाही. त्याचप्रमाणे इगतपुरी रेंजला ही आरएफओची प्रतीक्षा आहे. नाशिक पश्चिम वनविभागातील सिन्नर प्रादेशिक वनपरिक्षेत्राचे प्रवीण सोनवणे यांची बदली करण्यात आल्याने त्यांच्या रिक्त पदावर ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प येथील मनीषा जाधव यांची नव्याने नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पूर्वच्या दिंडोरी वनपरिक्षेत्राचे गणेश गांगोडे यांची बदली करण्यात येऊन त्यांच्या रिक्त पदावर नांदेड येथील पुजा जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नांदगाव प्रादेशिक वनपरिक्षेत्राच्या रिक्त पदावर मेवासी, धुळे येथील चंद्रकांत कासार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जामन्या वन्यजीव विभागातील अक्षय म्हेत्रे यांच्याकडे येवला वनपरिक्षेत्राची धुरा देण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर वनपरिक्षेत्राच्या रिक्त पदाचा कारभार पाल वन्यजीवचे राजेश पवार यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. नाशिक सामाजिक वनीकरणाचे आरएफओ प्रदीप कदम यांची बदली झाल्याने त्यांच्या रिक्त पदावर यावल प्रादेशिकचे विशाल कुटे यांची नियुक्ती केली गेली आहे. इगतपुरी सामजिक वनीकरण विभागात गुगामल वन्यजीव विभागाचे हिरालाल चौधरी यांची नियुक्ती केली गेली आहे.
नाशिकला दोन महिला 'आरएफओ' यापूर्वी नाशिक वनविभागात केवळ पेठ येथे महिला वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यरत आहे.नव्याने झालेल्या बदली आदेशानुसार नाशिक पूर्वमधील दिंडोरी आणि पश्चिममधील सिन्नर येथे दोन महिला वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना संधी देण्यात आली आहे. या दोन्ही रेंजमध्ये मानव-बिबट्या संघर्षाचे त्यांच्यापुढे आव्हान राहणार आहे.