त्र्यंबकेश्वरी ७० बेड्सचे क्वॉरण्टाइन युनिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 09:54 PM2020-04-21T21:54:32+5:302020-04-21T21:54:48+5:30
पुढाकार : गजानन महाराज संस्थानकडून सुविधा उपलब्ध
त्र्यंबकेश्वर : करोडो अनुयायाचे श्रद्धास्थान असणारे श्री गजानन महाराज यांचे मंदिर बंद असतानाही गजानन महाराज संस्थानचे सेवाकार्य सुरूच आहे. संस्थानने कोरोनात कम्युनिटी किचन अंतर्गत गरजूंना भोजन वितरणाची व्यवस्था करतानाच ७० बेडचे क्वॉरण्टाइन युनिट उपलब्ध करून देत सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.
संस्थानच्या त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, ओंकारेश्वर शाखेतही असेच सेवाकार्य अविरत सुरू आहे. नेहमी सामाजिक व सेवाभावी कार्यात अग्रेसर असणाऱ्या गजानन महाराज संस्थाननेही प्रशासनाच्या मदतीसाठी सेवाभावनेतून सेवाकार्य सुरू केले आहे. यामध्ये श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील वेगवेगळ्या भागात ५०० भोजन पॅकेट्सचे वितरण केले जात आहे. हरसूल गाव परिसर, आदिवासी पाडे, दोबाडवाडी परिसर, साबळबारी, चिकाटी पाडा, कोटंबी, फणसपाडा, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची मुले असलेले आधारतीर्थ अनाथालय आश्रम, खरपडी, देवडोंगरा, देवडोंगरी बोरीपाडा, खरशेत, सावरपाडा आदी भागात भोजन सुरू आहे. गोरगरी ब व गरजूंना कम्युनिटी किचनअंतर्गत दररोज एकूण ६६१५ भोजन पाकीटचे वितरण सुरक्षित अंतर राखून काळजीपूर्वक केले जात आहे. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस वाढत असलेल्या रुग्णसंख्येमुळे गजानन महाराज संस्थान, शेगाव शाखा श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील शाखेमध्ये ७० बेड्सचे सुसज्ज क्वॉरण्टाइन युनिट उभारण्यात आले असून, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथील डॉक्टर्स, नर्स व आदी कर्मचारी वृंद यांचेकरिता निवासव्यवस्थेसह चहा, नास्ता, भोजनाची सुविधा पुरविण्यात येत आहे. तसेच कोरोनाचा संसर्ग होऊ नये याकरिता संस्थानकडून जनजागृती करण्यात येत आहे.