त्र्यंबकेश्वर मंदिरात पिशव्या नेण्यास बंदीफेरीची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2017 04:48 PM2017-07-27T16:48:34+5:302017-07-27T16:48:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : श्रावणमासानिमित्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या श्री त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेण्यासाठी भाविकांची होणारी गर्दी पाहता भाविकांच्या सुरक्षिततेसाठी मंदिरात बॅग व पिशव्या नेण्यास बंदी घालण्याचा आदेश अपर जिल्हा दंडाधिकाºयांनी जारी केला आहे.
श्रावण महिन्याच्या तिसºया सोमवारी ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा घालण्यासाठी दोन ते तीन लाख भाविक त्र्यंबकेश्वर येथे येत असल्यामुळे या गर्दीचे नियोजन करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली असून, सालाबादप्रमाणे यंदाही मोठी गर्दी होण्याची शक्यता गृहीत धरून आपत्तीचा प्रसंग टाळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वतोपरी उपाययोजना केल्या जात आहेत. प्रदक्षिणा मार्गावर होणारी गर्दी पाहता या मार्गावर कोणतीही बेवारस अथवा संशयास्पद वस्तू आढळल्यास त्यास स्पर्श न करता तत्काळ पोलिसांना कळविण्यात यावे, अशा सूचना अपर जिल्हा दंडाधिकारी रामदास खेडकर यांनी दिल्या आहेत. श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात या काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने भाविकांना बॅग व पिशव्या नेण्यास बंदी घालण्यात आली असून, मौल्यवान चीजवस्तू भाविकांनी सोबत बाळगू नये तसेच संशयास्पद व्यक्ती वा हालचाली जाणवल्यास पोलिसांच्या निदर्शनास आणून द्याव्यात. अधिकृत पार्किंगच्या ठिकाणीच वाहने उभी करावीत तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.