त्र्यंबकला स्वच्छता कर्मचा-यांचे काम बंद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 04:06 PM2019-03-29T16:06:34+5:302019-03-29T16:07:18+5:30
ठेकेदाराविरुद्ध छळवणुकीची तक्रार
त्र्यंबकेश्वर : उपस्थित असतांना हजेरी पुस्तकावर खाडे लावणे, पगारच कमी काढणे, कर्मचाऱ्यांशी असभ्य भाषा वापरणे आदी छळवणुकीचा आरोप करत शहरातील सफाई कर्मचाऱ्यांनी ठेकेदाराचा निषेध म्हणून गुरुवार (दि.२८) पासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे शहरात कचरा उचलला न गेल्याने ढिग साचायला सुरुवात झाली आहे.
त्र्यंबक नगरपालिकेने सफाई कामांचा ठेका दिलेला आहे. परंतु, ठेकेदार व त्यांच्या माणसांकडून कर्मचा-यांची पिळवणूक केली जात असल्याची तक्रार करत कर्मचा-यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्यामुळे गावात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. ब-याच ठिकाणी घंटागाडी पोहोचलेली नाही. काही ठिकाणी पेटलेल्या होळीची राखसुध्दा उचलली गेली नाही. शहरात स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरु आहे. त्यात सफाई कर्मचा-यांनी आंदोलन पुकारल्याने नगरपालिकेच्या पदाधिका-यांसह प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. ठेकेदाराने मात्र १ एप्रिलपासून काम न करण्याचा पवित्रा घेतला आहे. मात्र, सध्या लोकसभा निवडणुकीची आचार संहिता सुरू असल्याने नवीन ठेका देण्यासही अडचण निर्माण झाली आहे. पालिकेच्या मुख्याधिकारी सध्या इलेक्शन ड्युटीवर असल्याने त्यांच्या अपरोक्ष पदाधिका-यांनाही निर्णय घेणे अवघड झाले आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे.
परवानगी आवश्यक
त्र्यंबकेश्वरी सफाई कर्मचा-यांनी आंदोलन पुकारल्याने आरोग्य सभापती माधवी भुजंग यांनाच नागरिकांकडून जाब विचारला जात आहे. आचारसंहिता काळात नगराध्यक्षांना कलम ५८/२ अंतर्गत अत्यावश्यक कामांसाठी निर्णय घेण्याचे अधिकार असले तरी त्याबाबत जिल्हाधिका-यांची परवानगी घ्यावी लागणार आहे. पालिका प्रशासन काय निर्णय घेते याकडे आता लक्ष लागून असणार आहे.