त्र्यंबकला संततधार कायम
By admin | Published: September 19, 2015 10:14 PM2015-09-19T22:14:11+5:302015-09-19T22:15:03+5:30
त्र्यंबकला संततधार कायम
त्र्यंबकेश्वर : शहरात आज पुनश्च वादळी वाऱ्यासह पावसाची संततधार कायम होती. वातावरणात गारवाही वाढला आहे. या परिस्थितीतही त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. शुक्रवारी नाशिकला शाहीस्नानासाठी आलेल्या भाविकांनी त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी गर्दी केली होती.
काही भाविकांनी त्र्यंबकेश्वरला शाहीस्नान करून रामकुंडातही स्नान करण्याचा आनंद घेतला तर काही भाविकांनी रामकुंडात स्नान करूनही त्र्यंबकला स्नान करण्यास व दर्शनास गर्दी केली होती. दरम्यान, पावसाची संततधार सुरू असून, तासन्तास रांगेत उभे राहूनही दर्शन मिळणे दुरापास्त झाले होते; मात्र आता मंदिर त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी २२ तास खुले राहणार आहे. त्यामुळे भाविकांना त्र्यंबकराजाचे दर्शन मिळणार आहे. जोरदार वाऱ्यामुळे त्र्यंबक शहरातील अनेक आश्रमांचे तसेच शंकराचार्य, परमहंस नित्यानंद, नरेंद्रगिरी, सागरानंद, हरिगिरी यांचे व इतर साधू-महंतांचे अनेक होर्डिंग्ज वाऱ्याने कोसळले. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली होती. दरम्यान, त्र्यंबकला शनिवारी, २८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. आतापर्यंत ९२४ मिमी पाऊस झाला. त्यामुळे त्र्यंबकेश्वरचा समावेश दुष्काळात राहणारच. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि.२१) सकाळी १० वाजता टंचाई परिस्थितीबाबत बैठक आयोजित केली आहे. (वार्ताहर)