कोकणगाव फाट्यावर तिहेरी भीषण अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 08:47 PM2021-03-18T20:47:00+5:302021-03-19T01:21:26+5:30
पिंपळगाव बसवंत : मुंबई- आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाट्यावर असलेल्या शनी मंदिराजवळ गुरुवारी (दि.१८) दुपारी रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर कार धडकल्यानंतर बसवर जाऊन आदळल्याने झालेल्या तिहेरी भीषण अपघातात बागलाण येथील तरुणी जागीच ठार झाली असून, अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
पिंपळगाव बसवंत : मुंबई- आग्रा महामार्गावरील कोकणगाव फाट्यावर असलेल्या शनी मंदिराजवळ गुरुवारी (दि.१८) दुपारी रस्त्यावर उभ्या असलेल्या नादुरुस्त ट्रकवर कार धडकल्यानंतर बसवर जाऊन आदळल्याने झालेल्या तिहेरी भीषण अपघातात बागलाण येथील तरुणी जागीच ठार झाली असून, अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकहून बागलाणच्या दिशेने जाणाऱ्या टाटा टॅगो कार (क्र. एमएच-०५ डीएच-९३५७) चालकाला कोकणगाव येथील शनी मंदिराजवळ नादुरुस्त असलेल्या ट्रकचा (क्र. एमएच-१५ बीजे-३३५५) अंदाज न आल्याने त्याने ट्रकला कट मारला. त्यातून चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार दुसऱ्या लेनला गेली असता मागून येणाऱ्या चाळीसगाव डेपोच्या एसटी बसने (क्र. एमएच-२० बीएल-२४१०) कारला जोरदार धडक दिली. त्यामुळे कार महामार्गाच्या कडेला असलेल्या खड्ड्यात फेकली गेल्याने कारमधील मुंबई येथे कार्यरत असलेले व बागलाण तालुक्यातील बाभुळना येथील रहिवासी पोलीस हवालदार पंडित बाबूराव चौरे (४७), पत्नी वैशाली पंडित चौरे (३९), मुलगा सागर पंडित चौरे (२२), चालक संजय बागूल (४२) हे गंभीर जखमी झाले, तर मुलगी मयुरी पंडित चौरे (१८) हिचा अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तात्काळ खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या तीन वाहनांच्या झालेल्या अपघाताची नोंद पिंपळगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, पुढील तपास भाऊसाहेब पटारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दीपक निकुंभ, पवार आदी करत आहेत.
टोल प्रशासनाची दिरंगाई
महामार्गावर अपघात घडला अथवा एखादे वाहन रस्त्यातच नादुरुस्त झाले, तर त्याठिकाणी तात्काळ टोल प्रशासन सेवा पुरवत असते. नादुरुस्त वाहनाच्या आजूबाजूला बॅरिकेडस् लावणे, ते वाहन जर महामार्गाच्या मधोमध असेल, तर टोचन करून ते रस्त्याच्या कडेला उभे करणे, अशी टोल प्रशासनाकडून अपेक्षा असते. मात्र, टोलनाक्यापासून अवघ्या पाचशे मीटर अंतरावर ट्रक नादुरुस्त होऊनही टोलनाका प्रशासनाने त्यासंबंधी काहीही कार्यवाही न केल्याने अशा अपघातांना निमंत्रण मिळत असल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे.