संशयित गुन्हेगाराला घेऊन पोलीस बाईकवरून निघाले ‘ट्रीपल सीट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 05:07 PM2019-05-27T17:07:39+5:302019-05-27T17:09:01+5:30
वाहतूक नियमाचा भंग कर्तव्य बजावाताना ‘खाकी’वर असलेल्या दोघा पोलिसांनी केल्याची चित्रफित सध्या सोशलमिडियावर चांगलीच गाजतेय.
नाशिक : एरवी वाहतूक नियम पाळले नाही, म्हणून दंडूका उगारणाऱ्या पोलिसांकडूनच जेव्हा वाहतूकीचे नियम धाब्यावर बसवून ‘कर्तव्य’ पार पाडले जाते, तेव्हा त्यांचा अशा प्रतापाविषयी शहरात चर्चा तर होणारच! वाहतूक नियमाचा भंग कर्तव्य बजावाताना ‘खाकी’वर असलेल्या दोघा पोलिसांनी केल्याची चित्रफित सध्या सोशलमिडियावर चांगलीच गाजतेय.
कायदासुव्यवस्थेला धोका पोहचविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यान्वित आहे. अशाच एका संशयित गुन्हेगाराला भद्रकाली पोलिसांनी ताब्यात घेतले आणि त्याची वैद्यकिय तपासणी करण्यासाठी जिल्हा शासकिय रूग्णालयात आणले; मात्र एका दूचाकीवरून. वैद्यकिय तपासणी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तसेच दोघा पोलिसांनी संशयिताला दुचाकीवर मध्यभागी बसवून पुन्हा पोलीस ठाण्यात पोहचविले. दरम्यान, जिल्हा शासकिय रूग्णालय ते भद्रकाली पोलीस ठाणेदरम्यान येणाºया त्र्यंबकनाका सिग्नलवर जेव्हा हे पोलीस दुचाकी घेऊन थांबले तेव्हा, त्यांच्याकडून झालेला नियमभंग एका अज्ञात तरू णाने मोबाईलमध्ये टिपला आणि सोशलमिडियावर ‘पोस्ट’ केला, मग काय, ‘नाशिक पोलिस’ सोशलमिडियावर चांगलेच गाजले. दोन दिवसांपासून पोलिासांची चित्रफित सोशलमिडियावर व्हायरल होत आहे.
सर्वसामान्य जनतेला हेल्मेटचे महत्त्व पटवून सांगणाºया शहर वाहतूक पोलिसांकडून मात्र या ‘खाकी’ घातलेल्या पोलिसांना छूट सिग्नलवर मिळाली. एकूणच वाहतूकीचे नियम न पाळल्यास नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणारी पोलीस यंत्रणा त्यांच्याच कर्मचाºयांवर काय कारवाई करणार याकडे नाशिककरांचे लक्ष लागले आहे? कर्तव्य बजावण्यासाठी जरी हे दोघे पोलीस प्रयत्नशील असल्याचे दिसून येत असले तरी सुरक्षेच्यादृष्टीने तसेच वाहतूक नियमांअंतर्गतदेखील पोलिसांचा हा प्रयत्न अवैध असल्याचे दिसून येतो. त्यामुळे पोलिस जेव्हा वाहतूक नियम मोडतात तेव्हा? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
संशयित गुन्हेगार लहान की मोठा? यावरून गुन्हेगाराचा अंदाज बांधता येऊ शकत नाही. एखाद्या लहान गुन्हेगाराकडूनही गंभीर स्वरूपाचा गुन्हा घडू शकतो, कारण गुन्हेगार हा अखेर गुन्हेगार असतो. दुचाकीवरून जेव्हा गुन्हेगाराची ने-आण केली गेली त्यावेळी त्याने तावडीतून निसटण्यासाठी पोलिसांना नुकसान पोहचविण्याचा प्रयत्न केला असता तर ? असा प्रश्नही उपस्थित होत आहे. पोलिसांनी सुरक्षेविषयी गाफील राहून संशयिताची वैद्यकिय तपासणीसाठी चक्क दुचाकीवरून ने-आण केल्याचे बोलले जात आहे. तसेच वाहतूक नियम सर्रासपणे शहरातील मध्यवर्ती भागात मोडल्याने पोलिसांविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.
--