तृप्ती देसार्इंच्या अफवेने पुन्हा एकवटले त्र्यंबककर
By admin | Published: March 8, 2016 11:54 PM2016-03-08T23:54:34+5:302016-03-09T00:06:24+5:30
तृप्ती देसार्इंच्या अफवेने पुन्हा एकवटले त्र्यंबककर
त्र्यंबकेश्वर : सध्या त्र्यंबकेश्वरच्या हिंदुत्ववादी महिला व पुरुष त्र्यंबकेश्वर मंदिरातील परंपरा जपण्याचा प्रयत्न करीत आहेत. मंगळवारी (दि.८) सकाळी त्र्यंबक शहरातील सिंहस्थात बसविण्यात आलेल्या ध्वनिक्षेपकाव्दारे त्र्यंबक तृप्ती देसाई व त्यांच्या सहकारी महिला त्र्यंबकेश्वर येथे येत असून, त्या गर्भगृहात प्रवेश करणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे त्र्यंबककरांनी त्यांना विरोध करण्यास मंदिर परिसरात पहाटेपासून गर्दी केली होती.
गावातील हिंदुत्वप्रेमी नागरिक-अंघोळ करून मंदिराकडे आले. पोलीस प्रशासनही मंदिराकडे येऊन सज्ज झाले. पुन्हा सोमवार प्रमाणेच वातावरण निर्मिती झाली व भूमाता ब्रिग्रेडच्या महिलांना विरोध करण्यासाठी सर्व महिला सरसावून बसल्या; परंतू दुपारपर्यंत कुणीही आले नाही.
एकदाचा सोक्षमोक्ष लावा. तृप्ती देसाई व त्यांच्या कार्यकर्त्यांना त्र्यंबकेश्वरला येऊ द्याच, आम्ही त्यांच्याशी बोलू, त्यांनी पटवून सांगू, त्यांना त्यांच्या निर्णयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करू असे त्र्यंबकच्या महिला भाविकांनी आग्रह धरला. मात्र पोलिसांकडून नकार देण्यात आला.
तृप्ती देसाई यांच्यासह सहकाऱ्यांना पोलिसांनी नांदूरशिंगोटे येथे ताब्यात घेतले असून, त्यांच्या अन्य सहकारी त्र्यंबकेश्वर येथे येत आहेत. त्या कोणत्याही क्षणी मंदिरात घुसून गाभाऱ्यात प्रवेश करतील,या ध्वनीक्षेपकावरून देण्यात आलेल्या सुचनेबाबत असे दिवसभर चर्चा होती. महाशिवरात्रीच्या दिवशी ज्या जुना आखाड्याच्या साध्वी हरसिद्धिगिरी पुन्हा आल्या आणि त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरासमोरील कारंजाला लागून असलेल्या मंडपात उपोषण केले.
स्वामी सागरानंद सरस्वती, स्वामी गिरीजानंद सरस्वती, केशवानंद आदींनी तिला मंदीरात नेऊन दर्शन घडविले. त्यानंतर तिने उपोषण सोडले.
त्र्यंबकेश्वर येथे अखाडा परिषदेची धर्मसंसद श्रीमहंत हरिगिरीजी घेणार आहेत. त्यामध्ये महिलांना गर्भगृहात प्रवेश द्यावा की परंपरेनुसार प्रवेश देऊ नये यावर विचार विनिमय होणार असल्याचे साध्वी हरसिद्धिगिरी यांनी माध्यमाशी बोलतांना सागितले.
परंपरेचे पालन व्हायलाच पाहिजे, परंपरा खंडीत होऊ नये असे आखाड्याचे संरक्षक श्री महंत हरिगिरीजी महाराज यांनी दुरध्वनीवरून सागितले. महिलांना गर्भगृहात जाऊन दर्शन करण्याची इच्छा असेल तर त्र्यंबकेश्वर येथील पुरोहीत संघ, देवस्थान पूजक, साधू-संत तसेच शंकराचार्य, पत्रकार आदींची संयुक्त बैठक घेऊन त्यात निर्णय घेण्यात येणार असून, त्यासाठी धर्मसंसदेच्या बैठकीची तारीख सर्वानुमते आणि सर्वांना सोयीची होईल अशी ठरविण्यात येणार असल्याचे त्यांनी सागितले. (वार्ताहर)