यशस्वी करिअरसाठी त्रिसूत्रीची आवश्यकता - अविनाश धर्माधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:00 AM2018-06-17T00:00:11+5:302018-06-17T00:00:11+5:30
‘स्व’ची ओळख, त्यानुसार कामाच्या क्षेत्राची निवड आणि निवड केलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होण्यासाठी तपश्चर्या करण्याची तयारी या त्रिसूत्रीच्या जोरावर यशस्वी करिअर करता येते, असे प्रतिपादन चाणक्य मंडळ परिवारचे संस्थापक संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी केले़
नाशिक : ‘स्व’ची ओळख, त्यानुसार कामाच्या क्षेत्राची निवड आणि निवड केलेल्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत होण्यासाठी तपश्चर्या करण्याची तयारी या त्रिसूत्रीच्या जोरावर यशस्वी करिअर करता येते, असे प्रतिपादन चाणक्य मंडळ परिवारचे संस्थापक संचालक अविनाश धर्माधिकारी यांनी केले़ दादासाहेब गायकवाड सभागृहात ‘दहावी-बारावीनंतर काय’ या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते़ करिअरबाबत अधिक मार्गदर्शन करताना धर्माधिकारी यांनी सांगितले की, केवळ डॉक्टर, इंजिनिअर होणे म्हणजेच करिअर नव्हे, तर त्यांनी त्यांच्या क्षेत्रात उत्तम व प्रतिभावंत असणे म्हणजे करिअर होय़ नृत्य, संगीत, शेती, अभिनय, खेळ अशी करिअरचीवेगवेगळे क्षेत्र असून, यामधील सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर, अमिताभ बच्चन हे त्यांच्या क्षेत्रातील राजे आहेत़ प्रत्येकाला आपापल्या आवडीच्या क्षेत्रात राजा होता आले पाहिजे़ हे राजा होणे म्हणजे त्रिसूत्रीचा अंगीकार करणे होय़ करिअरचा कल कोठे आहे, काय येते, किती समजते यावर करिअरची दिशा अवलंबून असते़ त्यामुळे मनाचा, बुद्धीचा कल कोठे आहे हे समजणे गरजेचे आहे़ मेंदू असलेला व इजा न झालेला प्रत्येक जण बुद्धिमान आहे. मात्र प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असून, ती वेगवेगळ्या क्षेत्रात चालते़ करिअरच्या दृष्टिकोनातून सर्व क्षेत्र ही समान आहेत. स्वत:ची ओळख करून घेत त्यानुसार करिअरची निवड करणे, करिअरला आवश्यक गुण स्वत:मध्ये असणेही तितकेच महत्त्वाचे आहे़ चाणक्य मंडळातील यशस्वी विद्यार्थ्यांची ध्वनिचित्रफीत दाखविण्यात आली़ धर्माधिकारी यांनी व्याख्यानाच्या सुरुवातीला क्रीडा मानसोपचारतज्ज्ञ भीष्मराज बाम यांना श्रद्धांजली वाहिली़
कागदावर निवड होण्याचे दिवस संपले
शैक्षणिक व व्यावसायिक नोकरीसाठी सुयोग्य व्यक्तीच्या निवडीसाठी जी परीक्षा घेतली जाते तिला स्पर्धा परीक्षा असे म्हणतात़ केवळ कागदावर निवड होण्याचे दिवस आता संपले असून, यापुढे मुलाखत, व्यक्तिमत्त्व विकास चाचणी, तुमचे वागणे-बोलणे, प्रश्नांची उत्तरे येत नसेल तर नाही म्हणण्याचे धारिष्ट्य यावर निवड अवलंबून असते़ दु:खितांचे अश्रू पुसता आले का यावर करिअरची यशस्वीता अवलंबून असल्याचे धर्माधिकारी यांनी सांगितले़