कोरोना लसीकरणात तृतीयपथींची उपेक्षा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:14 AM2021-07-26T04:14:03+5:302021-07-26T04:14:03+5:30
मालेगाव : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ४५ वर्षांपुढील नागरिकांसह परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण केले गेले. मात्र कोरोनाकाळात केंद्र ...
मालेगाव : महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ४५ वर्षांपुढील नागरिकांसह परदेशात जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण केले गेले. मात्र कोरोनाकाळात केंद्र आणि राज्य शासनातर्फे शासनाला मदत करणारे तृतीयपंथी कोरोना लसीकरणापासून वंचित असल्याचे दिसून आले.
लॉकडाऊन असताना मनमाडसह विविध शहरांमधून पोलिसांना तृतीयपंथींनी मदत केली. कोरोना नियमांचा प्रचार केला. नागरिकांना मास्क बांधण्यास भाग पाडले. तोंडाला मास्क लावण्यास प्रवृत्त केले. त्यासाठी त्यांना शासनाकडून कोणताही मोबदला मिळाला नाही. मालेगावात कोरोनाकाळात सर्व व्यवहार बंद असल्याने लोकांचे रोजगार बुडाले, अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. त्यांची उपासमार होऊ लागली. अशा वेळी सामाजिक भान ठेवत तृतीयपंथींनी विविध भागांत हजारो लोकांना तांदूळ, धान्य, खाद्य तेलाची पाकिटे पाेहोचवून मदत केली. तरीही तृतीयपंथींकडे मात्र कुणाचे लक्ष गेले नाही. त्यांना आर्थिक मदत नको, मात्र त्यांच्या आरोग्याची काळजी शासनाने घ्यायला हवी होती, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मनपाला सापडले केवळ ६ तृतीयपंथी
शहरात महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे लसीकरणासाठी तृतीयपंथींचा शोध घेतला जात आहे. आतापर्यंत केवळ ६ तृतीयपंथी नागरिक मनपा आरोग्य विभागाला मिळून आले. मनपा आरोग्य कर्मचाऱ्यांनी महसूल विभागाच्या मतदार यादीतून ६ तृतीयपंथी शोधले. त्यांचे लसीकरण अद्याप झालेले नाही. तृतीयपंथी शोधून त्यांना काेरोनाचे दोनही डोस देण्यात येणार आहेत. मात्र तृतीयपंथी शोधणे मनपाला जिकिरीचे जात आहे. मनपाच्या आरोग्य विभागाकडून तृतीयपंथी शोधून त्यांची यादी बनविण्याचे काम सुरू असल्याचे डॉ. अलका भावसार यांनी सांगितले.