संगमनेर महाविद्यालयाला करंडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 09:46 PM2020-01-24T21:46:47+5:302020-01-25T00:31:20+5:30
दोडी बुद्रुक येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात दादा पाटील केदार स्मृती करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या किरण कीर्तीकर हिने प्रथम पारितोषिक मिळवले. तर स्मृती करंडकावर संगमनेर महाविद्यालयाने नाव कोरले.
सिन्नर : तालुक्यातील दोडी बुद्रुक येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात दादा पाटील केदार स्मृती करंडक राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात पार पडली. स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या किरण कीर्तीकर हिने प्रथम पारितोषिक मिळवले. तर स्मृती करंडकावर संगमनेर महाविद्यालयाने नाव कोरले.
माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग केदार अध्यक्षस्थानी होते. व्यासपीठावर पंचायत समिती सभापती शोभा बर्के, जिल्हा परिषद सदस्य नीलेश केदार, रामनाथ पावसे, संस्थेचे उपाध्यक्ष कारभारी आव्हाड, राजाराम आव्हाड, कारभारी शिंदे, रफिक मणियार, शिक्षणाधिकारी पांडुरंग विंचू, वि. बी. खेडकर, अशोक गिते आदी उपस्थित होते. वक्तृत्व स्पर्धेत पाच हजारांचे प्रथम पारितोषिक मुंबईच्या किरण कीर्तीकर हिने मिळवले. करंडकावर संगमनेर महाविद्यालयाने मोहर उठविली. द्वितीय पारितोषिक (तीन हजार रु पये) स्मृती बोरसे- एचपीटी महाविद्यालय नाशिक व अमोल मसलखांब यांनी संयुक्तरीत्या पटकाविले. तृतीय पारितोषिक (दोन हजार रुपये) आदित्य माने (गरवारे कॉलेज पुणे) यास मिळाले. उत्तेजनार्थ वैभव महाजन व नीलेश वडीतल्ले (अमृतवाहिनी कॉलेज, संगमनेर) यांनी मिळविले. प्राचार्य संदीप भाबड यांनी स्पर्धेविषयी माहिती दिली. एन. बी. वाकचौरे यांनी प्रास्ताविक तर के. के. घुगे यांनी सूत्रसंचालन केले.
पी. एस. उगले यांनी आभार मानले. ग्रामीण भागात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करणारे दोडी महाविद्यालय पहिले असून, विद्यार्थ्यांच्या वक्तृत्वाला चालना देण्याच्या उपक्रम गौरवास्पद असल्याचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले.