कमी विवाह मुहूर्तामुळे मंगल कार्यालय, केटरिंग व्यावसायिक येणार अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 8, 2017 03:54 PM2017-11-08T15:54:49+5:302017-11-08T16:02:06+5:30
अवघे ६४ विवाह मुहूर्त : उलाढालीवर होणार परिणाम, वधूपालकही चिंतेत
नाशिक : गुरू-शुक्राचा अस्त, चतुर्मास आणि त्यात अधिक ज्येष्ठ मास यामुळे येत्या वर्षभरात अवघे ६४ विवाह मुहूर्त असल्याने मंगल कार्यालये, लॉन्ससह केटरिंग व्यवसाय अडचणीत सापडणार आहे. विवाह सोहळ्याशी संबंधित व्यवसायातील कोट्यवधीची उलाढालही मंदावणार असून, दाट लग्नतिथीमुळे सर्व योग जुळवून आणताना वधूपालकांची दमछाक होण्याची चिन्हे आहेत.
तुळशीचे लग्न आटोपल्यानंतर आता येत्या २१ नोव्हेंबरपासून लग्नाचे बार उडण्यास सुरुवात होणार आहे. १२ डिसेंबर २०१७ नंतर पौष महिन्यात विवाहाचे मुहूर्त नाहीत. त्यामुळे थेट ५ फेबु्रवारी २०१८ रोजीच विवाह मुहूर्त आहे. १४ मार्चनंतर पुन्हा चैत्र महिन्यात मुहूर्त नाहीत. दि. १६ डिसेंबर २०१७ ते १ फेबु्रवारी २०१८ दरम्यान शुक्राचा अस्त, दि. १६ मे ते १३ जून २०१८ या कालावधीत ज्येष्ठ अधिक मास, दि. २३ जुलै ते २० नोव्हेंबर २०१८ या कालावधीत चतुर्मास आणि दि. १५ नोव्हेंबर ६ डिसेंबर २०१८ या दरम्यान गुरूचा अस्त असल्यामुळे विवाह मुहूर्त नाहीत. त्यामुळे वर्षभरात केवळ ६४ विवाह मुहूर्त असणार असून, या मुहूर्तावर लग्नाचा बार उडवताना वधू-वर पित्यांची चांगलीच दमछाक होताना दिसून येणार आहे. कमी विवाह मुहूर्त असल्यामुळे विवाह सोहळ्याशी संबंधित मंगल कार्यालये, लॉन्सचालक, केटरिंग व्यावसायिक, स्टेज सजावटकार यापासून ते पुरोहितापर्यंत सारेच आर्थिक अडचणीत सापडणार आहेत. आधीच नोटाबंदीनंतर उद्भवलेल्या परिस्थितीतून अद्यापही मंगल कार्यालयासह केटरिंग व्यावसायिक मंदीच्या परिस्थितीतून बाहेर आलेले नाही. त्यात घटत्या विवाह मुहूर्तांमुळे व्यावसायिकांच्या आणखी चिंता वाढणार आहेत. विवाह सोहळ्याशी निगडित छायाचित्रकार, सजावटकार, फुलविक्रेते, पुरोहित आदी छोटे व्यावसायिकही अडचणीत येणार आहेत. दाट लग्नतिथीच्या दिवशी संबंधित व्यावसायिकांची सुविधा पुरविताना दमछाक होणार आहे. विवाह मुहूर्तांची संख्या कमी असल्यामुळे आतापासूनच पुढील वर्षाच्या तारखांना मंगल कार्यालयांसह केटरिंग व्यावसायिकांचे बुकिंग सुरू झाले असून, अपेक्षित मंगल कार्यालय मिळविताना वधूपित्यांची दमछाक होताना दिसून येत आहे.
२०१८ मध्ये विवाह मुहूर्त कमी
गुरू-शुक्राचा अस्त काळ आणि अधिक मासात विवाह केले जात नाहीत. सन २०१८ मध्ये विवाह मुहूर्त कमी आहेत. त्यामुळे प्रत्येक मुहूर्तावर विवाहांची संख्या जास्त राहील. तुळशीचा विवाह आटोपल्यानंतर आता लग्नाचे बार उडण्यास सुरुवात होईल. विवाह मुहूर्त कमी असल्यामुळे एकाच तारखांना मंगल कार्यालय, केटरिंग, गुरुजी आदी सुविधा उपलब्ध होण्यास अडचणी येतील.
- जितेंद्र चित्राव, ज्योतिष अभ्यासक
आर्थिक फटका बसणार
सर्वसाधारणपणे वर्षभरात १०० मुहूर्त असले की, ४० ते ५० तारखांना बुकिंग होते. यंदा मात्र, मुहूर्तांची संख्या निम्म्यावर आल्याने बुकिंग आणखी घटणार आहे. त्यामुळे साहजिकच मंगल कार्यालयांना आर्थिक फटका बसणार आहे. मंगल कार्यालय अधिक दिवस रिकामे राहिले तर देखभालीचा जास्त खर्च येतो. याशिवाय वीज, पाणी यांचाही खर्च असतोच. मजुरांचेही वेतन द्यावे लागते.
- प्रकाश माळोदे, संचालक, शेवंता लॉन्स, नाशिक