ग्राहकांना मनस्ताप : नव्या नॉबच्या सिलिंडरला बसेना जुना रेग्युलेटर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 05:49 PM2019-05-25T17:49:18+5:302019-05-25T17:55:02+5:30
रात्रीच्या सुमारास सिलिंडर संपल्यास महिलावर्गाला त्याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. कारण रात्री स्वयंपाकगृहातील कारभार ठप्प पडतो, कारण रात्री वितरकांकडून कारागीरदेखील उपलब्ध करून दिला जात नाही.
नाशिक : शहर व परिसरातील नागरिकांना सध्या स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर वापरताना एक नव्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. कंपन्यांकडून अचानकपणे नवे नॉब असलेले गॅस सिलिंडर पुरविले जात असल्याने ग्राहकांकडे असलेले जुने रेग्युलेटर त्या सिलिंडरवर सहजासहजी योग्यरित्या बसत नसल्यामुळे ग्राहकांना डोकेदुखीसोबत धोकाही वाढला आहे. या समस्येविषयी वितरकांकडे अनेकदा तक्रारी करूनदेखील दखल घेतली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्वयंपाकासाठी लागणारा एलपीजी गॅस सिलिंडरची सर्व सुरक्षा रेग्युलेटरवर अवलंबून असते. रेग्युलेटर योग्यपणे बसविला गेला नाही किंवा त्यामध्ये तांत्रिकदृष्ट्या त्रुटी आढळून आल्यास गॅसगळती होऊन स्फोट होऊन आग लागण्याचा धोकाही उद्भवू शकतो. नव्या नॉबच्या सिलिंडरवर रेग्युलेटर काहीही करून बसत नाही. त्यामुळे वितरकांशी संपर्क साधून नागरिकांना अवेळी कारागिरांची मदत घ्यावी लागते. स्वयंपाकघरातील सिलिंडर कधीही संपत असल्यामुळे राखीव सिलिंडरला रेग्युलेटर लावणे हे ‘दिव्य’ ठरत आहे. रात्रीच्या सुमारास सिलिंडर संपल्यास महिलावर्गाला त्याचा अधिक त्रास सहन करावा लागतो. कारण रात्री स्वयंपाकगृहातील कारभार ठप्प पडतो, कारण रात्री वितरकांकडून कारागीरदेखील उपलब्ध करून दिला जात नाही. त्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो.
तोडगा काढणार कोण?
विविध कंपन्यांच्या वितरकांकडून केल्या जाणाऱ्या गॅस सिलिंडरचा पुरवठ्यादरम्यान नव्या नॉबच्या सिलिंडर आणि ग्राहकांकडे असलेले जुने रेग्युलेटर यांचे समीकरण जुळविण्यासाठी तोडगा काढण्याची गरज आहे. कारण सिलिंडरच्या नव्या नॉबचा आकार हा काहीसा अधिक असल्यामुळे कारागिरदेखील ग्राहकांना जेव्हा अशा सिलिंडरवर रेग्युलेटर बसवितात त्यावेळी नॉबला घासून घेतात; मात्र जेव्हा सिलिंडर संपते तेव्हा ग्राहकांची रेग्युलेटर काढताना पुन्हा दमछाक होते.
कुणाची म्हैस अन् कुणाला उठबैस
गॅस सिलिंडरचा नॉबची समस्या हा कंपन्यांचा प्रश्न जरी असला तरी त्याचा मनस्ताप मात्र ग्राहकांना सहन करावा लागत आहे. ग्राहकांना गॅस नोंदणीच्या वेळी रेग्युलेटरचा एकदाच पुरवठा केला जातो, त्यामुळे नवे रेग्युलेटर ग्राहक पुन्हा खरेदी करू शकत नाही. नवे नॉब असलेल्या सिलिंडरला रेग्युलेटर सहजरित्या न बसणे यास ग्राहक जबाबदार नसून कंपन्या जबाबदार आहे; मात्र गैरसोय ग्राहकांची होत असल्याने कुणाची म्हैस अन् कुणाला उठबैस अशी अवस्था झाली आहे.