त्र्यंबकेश्वर तालुक्यात टंचाई : टँकर, बैलगाडीने पाणीपुरवठा; पाण्यासाठी महिलांची भटकंतीआराखड्यात विंधनविहिरींवर भर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2018 11:28 PM2018-03-22T23:28:09+5:302018-03-22T23:28:09+5:30
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यात दरवर्षी टंचाई काळात टँकरने तसेच काही भागात बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याचे दुष्टचक्र संपता संपलेले नाही.
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर तालुक्यात दरवर्षी टंचाई काळात टँकरने तसेच काही भागात बैलगाडीने पाणीपुरवठा करण्याचे दुष्टचक्र संपता संपलेले नाही. नेतेमंडळी, आमदार, खासदार दर पाच वर्षांनी टँकरमुक्त तालुका करण्याची आश्वासने देतात; पण हे दुष्टचक्र अजूनही थांबलेले नाही आणि हीच मोठी शोकांतिका आहे. तालुक्यातील पाणीटंचाई दूर करू, तालुका टंचाईमुक्त करू अशी आश्वासने दर निवडणुकीत दिली जातात; मात्र एकदा निवडून गेले की त्यांना आपण दिलेल्या आश्वासनांचा विसर पडतो. निर्मला गावित गेल्या दहा वर्षांपासून या तालुक्याचे नेतृत्व करतात. महिला आमदार असल्याने त्यांना महिलांच्या समस्यांची जाणीव आहे. महिला वर्गाला पाण्याचा किती त्रास होत असतो याचीही जाणीव आहे. पण दहा वर्षांत त्यांना पाण्याची समस्या सोडविता आलेली नाही. अर्थात तालुका पूर्णत: टँकरमुक्त झाला नसला तरी टंचाईची दाहकता मात्र काही अंशी कमी झाली आहे. तथापि, दरवर्षी मार्चपासूनच तालुक्यात लोकांना टंचाई स्थितीशी सामना करण्याची वेळ येते आणि उन्हाळ्यातल्या पाणीटंचाईचे प्रारब्ध चुकता चुकत नाही. आता यावर्षी मात्र विंधनविहिरींवर भर देण्यात आला आहे. विंधनविहिरींनाच विद्युत कनेक्शनद्वारे नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित करून गावाला पाणीपुरवठा करावयाचा आहे. आणि योजना नाहीच यशस्वी झाली तर शेवटी टँकरने पाणीपुरवठा करण्याचा पर्याय आहेच. तालुक्यात तीन टप्प्यांत पाणीटंचाई भासते. आॅक्टोबर ते डिसेंबर पहिला टप्पा. जानेवारी ते मार्च दुसरा टप्पा व एप्रिल ते जून तिसरा टप्पा अशाप्रकारे नियोजन केले आहे. आराखडा आॅक्टोबरमध्ये केल्यावर टंचाई नियोजनात इगतपुरी-त्र्यंबकेश्वर मतदारसंघाच्या आमदार निर्मलाताई गावित, तहसीलदार महेंद्र पवार, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे व जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे उपअभियंता वनमने यांच्या स्वाक्षरीने टंचाई नियोजन आराखडा तयार केला जातो. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात सहसा टंचाई स्थिती निर्माण होत नाही. यावर्षी सन २०१७ च्या पावसाळ्यात समाधानकारक पाऊस पडला होता. त्यामुळे टंचाई स्थिती अद्यापपावेतो सुरू झालेली नाही. दि. १९ रोजी सोमनाथनगर येथील पहिलाच प्रस्ताव दाखल झाला आहे. यावर्षी तिसºया टप्प्यात ज्यांना टंचाईची झळ पोहोचेल अशा ८५ गावांचा व १८३ वाड्या-पाड्यांचा आराखड्यात समावेश करण्यात आला आहे व त्या दृष्टीने प्रशासनाने नियोजन केले आहे. या नियोजनात ५५ गावांना व १०९ वाड्या-पाड्यांना नव्याने विंधनविहिरी घेणे प्रस्तावित आहे, तर टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी एकूण ३० गावे व ७० वाड्यांना व १०४ गावांना पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. असे तिसºया टप्प्यात एकूण ८५ गावे व १८३ वाड्या मिळून २६८ गावांचे टंचाई नियोजन करण्यात आले आहे.