सक्तीच्या ‘टोल’वसुलीमुळे ट्रक चालक हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:24 AM2017-10-07T01:24:09+5:302017-10-07T01:24:22+5:30
पिंपळगावहून ओझरला येताना टोल नाका ओलांडल्यानंतर वाहन तपासणीसाठी पोलिसांकडून ट्रक थांबविण्यात येत असल्याने ट्रकचालक त्रस्त झाले असल्याची भावना काही चालकांनी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या या तपासणीला ट्रकचालक त्रस्त झाल्याची तक्रार करण्यात येत आहे.
ओझर : पिंपळगावहून ओझरला येताना टोल नाका ओलांडल्यानंतर वाहन तपासणीसाठी पोलिसांकडून ट्रक थांबविण्यात येत असल्याने ट्रकचालक त्रस्त झाले असल्याची भावना काही चालकांनी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या या तपासणीला ट्रकचालक त्रस्त झाल्याची तक्रार करण्यात येत आहे.
मुंबई-आग्रा महामार्गावरील निफाड तालुक्यातील सर्वात वर्दळीची दोन ठिकाणे आहेत. पिंपळगाव व ओझर दोन्ही ठिकाणी सहापदरीकरण अनेक वर्षांपासून रखडलेलेच असूनदेखील लांब पल्ल्याचे ट्रकचालक व अन्य माल वाहतूक करणारे आपल्या गाड्या कमी वेगात चालवून रस्ता ओलांडून वेग घेतात. तोच दोन्ही बाजूस कोकणगाव पिंपळगावच्या मध्यभागी टोलनाका आहे. येथे टोल भरणे अनिवार्य आहे. आधीच टोलचे दर बघून चक्रावले आहेत. बहुतांश मालवाहू गाड्यांना पुन्हा पोलिसांकडून अडविले जाते. कागदपत्रांची तपासणी करून पोलिसांना पैसे द्यावे लागत असल्याने ट्रकचालक त्रस्त झाल्याचे सांगतात. हा दुसरा टोल भरण्याची नामुष्की मोठ्या वाहनचालकांना येत असल्याची तक्रार ट्रकचालक करीत आहेत. वाहतूक पोलिसांच्या कठोर कारवाईमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पिंपळगावपासून नाशिक, मुंबईच्या दिशेला जाणाºयांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. सहापदरीमुळे वेग आटोक्यात आणून गाडी थांबविणे शक्य नसल्याने टोल भरल्यानंतर गाडी हळू असतानाच वाहतूक पोलीस सरळ दुचाकी आडवी लावत असल्याची तक्रार ट्रकचालकांनी केली आहे. यातील बहुतेक ट्रक महाराष्ट्राबरोबरच परराज्यातील असून, मालवाहू वाहनधारक त्रस्त असल्याचे चालक सांगतात.