ट्रकची टेम्पोला धडक : एकाच कुटुंबातील दोन्ही महिलांनी गमावले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:18 PM2021-02-25T16:18:28+5:302021-02-25T16:22:47+5:30
ट्रक चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वाहनावरील नियंत्रण गमावून समोरुन टेम्पोला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, टेम्पो रस्त्याच्याकडेला असलेल्या चारीत जाऊन उलटला. ट्रकचालक अपघातानंतर ट्रक सोडून फरार झाला
नाशिक: गिरणारे-धोंडेगाव रस्त्यावर बुधवारी रात्रीच्या सुमारास भरधाव जाणाऱ्या मालवाहु ट्रकने समोरुन येणाऱ्या छोटा हत्ती टेम्पोला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात गंगाम्हाळुंगी येथील एकाच कुटुंबातील दोन महिलांचा मृत्यु झाला तर पाच प्रवाशी गंभीररित्या जखमी झाले आहे. जखमींवर जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, गिरणारे-धोंडेगाव रस्त्याने बुधवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास पालवे कुटुंबिय त्यांच्या टेम्पोत (एम.एच१५ एफ.यु ९३६३) बसून गिरणारेकडून गंगाम्हाळुंगीच्या दिशेने प्रवास करत होते. यावेळी हरसुलच्या दिशेने गिरणारेकडे माती वाहून नेणारा अवजड ट्रक (एम.एच.०४ डीडी९०७०) भरधाव जात होता. ट्रक चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करत वाहनावरील नियंत्रण गमावून समोरुन टेम्पोला धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, टेम्पो रस्त्याच्याकडेला असलेल्या चारीत जाऊन उलटला. यावेळी टेम्पोतील महिला, पुरुष बाजूला फेकले गेले. रात्रीच्या अंधारात कोण कुठे जाऊन पडले, हे कोणालाही कळत नव्हते. यावेळी आजुबाजुच्या नागरिकांनी धाव घेत जखमींना तत्काळ खासगी वाहनाने जिल्हा शासकिय रुग्णालयात हलविले. तसेच रुग्णवाहिकांशी संपर्क साधून अपघातस्थळी मदत देण्याची मागणी केली. काही वेळेत रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहचल्या. सर्व जखमींना उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले.
यावेळी उपचार सुरु असताना रात्रीच्या सुमारास निर्मला जनार्दन पालवे (३०) तर गुरुवारी सकाळी रेखा उर्फ पुनम वाल्मिक पालवे (३५,दोघी, रा.गंगाम्हाळुंगी) यांचा मृत्यु झाला. तसेच टेम्पोचालक बाळु अर्जुन पालवे (३८), यशवंत काशिनाथ पालवे (४०), यमुना श्रावण पालवे (३०), भागाबाई भगवान पालवे (३०), तुळसाबाई तुळशीराम पालवे (४०), शिलाबाई देवानंद पालवे (४०,सर्व रा. गंगाम्हाळुंगी) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा शासकिय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ट्रकचालक अपघातानंतर ट्रक सोडून फरार झाला असून त्याच्यावरिुध्द तालुका पोलीस ठाण्यात गुरुवारी संध्याकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास तालुका पोलीस करत आहेत.
---