जानोरीत ८२ लाखांच्या विदेशी मद्यासह ट्रक हस्तगत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 05:54 PM2020-12-23T17:54:09+5:302020-12-23T17:55:06+5:30
जानोरी : कादवा म्हाळुंगी येथील कंपनीतून डिलीव्हरीसाठी पाठविण्यात आलेल्या ८२ लाख किंमतीच्या विदेशी मद्याची चोरी पाच दिवसांनंतर उघडकीस आल्याने ट्रकचालकास ताब्यात घेऊन मुद्देमाल हस्तगत करण्यात जानोरी पोलिसांना सोमवारी (दि. २१) सायंकाळी यश आले.
कादवा म्हाळुंगी येथील परनॉर्ड रिकार्ड इंडिया (सिग्राम ) कंपनीतून ८२ लाख रुपये किंमतीचे मद्य नाशिक येथील विजय गुलशन ट्रान्सपोर्टच्या बारा टायर ट्रकमध्ये (क्र. एमएच १५ डीके ४९५५) भरुन मालाची टीपीआर कॉपी ट्रकचालक इजाज खान समद खान यांच्या हवाली केले होते. सदर ट्रक दि. १७ डिसेंबर रोजी रात्री दहा वाजता अकोला येथे जाण्यासाठी रवाना झाली होती. दि. १९ रोजी ट्रकचालकाला मालाविषयी विचारणा केल्यावर त्याने मी गुरुवारी मालेगावच्या स्टार हॉटेलमध्ये थांबलो होतो, तेथेच ट्रक उभी करुन घरी निघून आल्याचे सांगितले. दुसऱ्या दिवशी सकाळी दहा वाजता स्टार हॉटेलजवळ ट्रक आढळून न आल्याने कंपनी प्रशासनाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी दिंडोरी पोलिसात सदर ट्रकचालकाविरोधात मालाचा अपहार झाल्याची फिर्याद नोंदविली. त्यानंतर ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील व जिल्हा पोलीस उपअधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक के. के. पाटील, पोलीस उपनिरीक्षक संजयकुमार सोनी, पोलीस हवालदार दीपक अहिरे, पोलीस हवालदार पुंडलीक राऊत, पोलीस हवालदार गणेश वराडे, पोलीस नाईक अमोल घुगे, पोलीस नाईक जालिंदर खराटे, पोलीस हवालदार हनुमंत महाले आदिंनी ट्रकचालक इजाज खान समद खान यास गाडी बाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने शंका आली. गुन्हे अन्वेषण विभागाने पोलिसी खाक्या दाखविताच त्याने गुन्ह्याची कबुली देऊन मुद्देमाल जानोरी येथे भाड्याने घेतलेल्या गोडाऊनमध्ये सुरक्षित असल्याचे सांगितले . त्यानुसार जानोरी येथील आशापुरा गोडाऊनमधून ८२ लाखांच्या विदेशी मद्य व ट्रकसह ९० लाख ३५ हजार ४५ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.