‘कसमादे’ परिसरात ट्रकने वाळूची तस्करी
By admin | Published: December 21, 2016 11:51 PM2016-12-21T23:51:38+5:302016-12-21T23:51:58+5:30
नवा फंडा : कारवाईची मागणी
सटाणा : शहरासह तालुक्यातील अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांच्या मुसक्या येथील तहसील प्रशासनाने आवळल्या असल्या तरी काही वाळूमाफियांनी यावर पर्याय शोधत नवाच फंडा सुरू केला आहे. बागलाण तालुक्यातील गिरणा, मोसम आणि आरम या नद्यांमधून खुलेआम वाळू उपसा गत काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर सुरू होता. सटाणा तहसील प्रशासनाने मागील १५ ते २० दिवसांपासून अशा वाळूमाफियांवर बडगा उगारत कारवाई सुरू केली. त्यातल्या त्यात आमदारांनी विधानसभेत तहसील-दारांविरोधात हक्कभंग आणल्याने आणखीनच आक्रमक झालेल्या तहसीलदारांनी जंग जंग पछाडत एकाच रात्री वाळू उपसा करणारे दहा वाहने पकडून आणली. छोट्या वाळूमाफियांवर झालेल्या या मोठ्या कारवाईने खूश झालेल्या काही बड्या वाळूमाफियांनी याला पर्याय शोधत संधीचे सोने करून घेतले आहे. नंदुरबार जिल्ह्यातल्या तापी नदीच्या वाळूचे लिलाव झाले नसले तरी या नदीमधून सटाणा, मालेगाव, कळवण आणि नाशिकमध्ये तापीची वाळू छुप्या मार्गाने येत असून, स्थानिक छोट्या वाळूमाफियांवर तहसील प्रशासनाने मोठी दंडात्मक कारवाई केल्याने कसमादे परिसरात वाळूचे भाव कमालीचे वधारले आहेत.
तापी नदीच्या वाळूमधील लिलाव झाले नसल्याने आणि स्थानिक वाळूमाफियांच्या मुसक्या आवळल्याने मोठी वाळूटंचाई निर्माण झाली आहे. (वार्ताहर)