मुथूट दरोड्यात वापरण्यात आलेला ट्रक ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 01:16 AM2019-07-02T01:16:07+5:302019-07-02T01:16:30+5:30
मागील महिन्यात शुक्रवारी (दि.१४) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सोने लूट करणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगारांनी उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा टाकला,
नाशिक : मागील महिन्यात शुक्रवारी (दि.१४) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सोने लूट करणाऱ्या टोळीतील सराईत गुन्हेगारांनी उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर दरोडा टाकला, मात्र त्यांना या दरोड्यात कुठल्याही प्रकारे लूट करता आली नाही. धाडसी साजू सॅम्यूअलच्या प्रतिकाराला कंटाळून दरोडेखोरांनी त्याच्यावर गोळ्या झाडून पळ काढला. दरोड्यातील लूट केलेला ऐवज वाहून नेण्यासाठी शिमला मिरचीच्या पोत्यांनी भरलेला आयशर ट्रक (जीजे ०५, बीयू ८६५१) पेठरोडवर शहराच्या वेशीजवळ उभा केलेला होता. याच आयशरमधून चोरट्यांनी आशेवाडी येथे दुचाकी सोडून सुरतकडे पलायन केल्याचे तपासात समोर आले आहे. पोलिसांच्या पथकाने सुरतमधून गुन्ह्यात वापरलेला आयशर अखेर ताब्यात घेतला आहे.
मुथूट दरोड्याच्या गुन्ह्यात पोलिसांनी टोळीचा मुख्य सूत्रधार जितेंद्रसिंग विनयबहाद्दूरसिंग राजपूत व शार्पशूटर परमेंदर सिंग या दोघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांचे उर्वरित आठ ते दहा साथीदार अद्याप फरार आहेत. परमेंदर सिंग याला ताब्यात घेतल्यानंतर या गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल तसेच आयशर टेम्पो पोलिसांच्या हाती लागला आहे. तत्पूर्वी घटनेच्या दुसºयाच दिवशी आशेवाडी रामशेज किल्ल्याच्या पायथ्याशी दरोडेखोरांच्या तीन पल्सर दुचाकी पोलिसांना आढळून आल्या होत्या. या दुचाकींवरूनच दरोडेखोरांपर्यंत पोलिसांच्या पथकाला पोहचता आले.
सराईत जितेंद्रसिंगची कबुली
बिहार राज्यातील एका कारागृहातून दरोड्याचा कट शिजविण्यात आला होता. त्यातील सर्व आरोपी बिहार, उत्तर प्रदेशमधील आहेत. या दरोड्यातील टोळीमधील परमेंदरसिंग हा सोने लुटीमधील कुख्यात गुंड सुबोधसिंगचा हस्तक असून, तुरुंगातून सुबोधसिंग हा या टोळीला सूचना करत असल्याचेही तपासात पुढे आले आहे. गुन्ह्याचा म्होरक्या जितेंद्रसिंग राजपूत याने पोलीस कोठडीत लुटीचा ऐवज वाहतूक करण्यासाठी स्वमालकीच्या टेम्पोतून पलायन केल्याची कबुली दिली़