‘आविष्कार’ नाटकातून खऱ्या प्रेमाची मांडणी
By admin | Published: January 14, 2015 01:06 AM2015-01-14T01:06:33+5:302015-01-14T01:08:25+5:30
हिंदी नाट्य स्पर्धा : मुंबई, नागपूरच्या नाट्यकर्मींकडून सादरीकरण
नाशिक : प्रेमाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन, त्यांच्याविषयीचे गैरसमज, त्यांचे वास्तव जीवन या बाबींवर मंगळवारी ‘आविष्कार’ या नाटकातून प्रकाश टाकण्यात आला. कलावंतांच्या दमदार अभिनयाने नाटकात रंगत आली. राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने सुरू असलेल्या ५४ व्या महाराष्ट्र राज्य हिंदी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत मुंबईच्या स्वयंसेवी समन्वय संस्थेच्या वतीने सकाळी ‘आविष्कार’, तर सायंकाळी नागपूरच्या बोधी फाउंडेशनच्या वतीने ‘कमेला’ हे नाटक सादर झाले. ‘आविष्कार’मध्ये हेमकांत या कलाकाराचे व त्याची प्रियसी असलेल्या ललिता यांच्या प्रेमाची दु:खी कथा आहे. हेमकांत हा उत्कृष्ट मूर्तीकार असतो़ ललितावर त्याचे प्रेम असते, परंतु ते स्वार्थी असते़ ललिताच्या सुंदर मूर्ती तो घडवतो या कलेच्या माध्यमातून दोघे बाहेर पडतात़ परंतु पे्रमापेक्षा त्यामध्ये भोग जास्त असतो़ यानंतर हेमकांत ललिताकडे दुर्लक्ष करतो तर ती त्याच्या मुलाची आई होणार असते़ मुलाच्या संगोपणासाठी ती वेश्या व्यवसाय स्वीकारते़ हेमकांतला त्याची चूक लक्षात येते, परंतु खूप उशीर झालेला असतो़ हेमकांतचे प्रेम अवेहरून ललिता त्याला सोडून दूर निघून जाते असा नाटकाचा शोकांत शेवट करण्यात आला आहे़ महेश एलकुंचवार लिखित व वासंती भगत दिग्दर्शित या नाटकात कदिर शेख व पूजा जव्हारे यांच्याप्रमुख भूमिका होत्या. प्रकाशयोजना विवेक भागवत, नेपथ्य रामेश्वर साळुंके, रंगभूषा राधिका नानीवडेकर, वेशभूषा सायली कार्लेकर, संगीत अभिषेक भगत यांचे होते.