दुसऱ्याचे भले करण्यातच खरा धर्म
By admin | Published: October 1, 2016 11:23 PM2016-10-01T23:23:31+5:302016-10-01T23:25:25+5:30
मोहनलाल सराफ : श्री अग्रसेनजी महाराजांच्या मूर्तीचे अनावरण
मालेगाव : दुसऱ्याचे भले करण्यासारखा इतर कोणताही धर्म नसल्याचे प्रतिपादन पांजरापोळ गोसेवा संस्थेचे उपाध्यक्ष मोहनलाल सराफ यांनी केले. येथील श्री अग्रसेन नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेचे कॅम्प रस्त्यावरील पारस एम्पायरमध्ये स्थलांतर झाले, त्याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून तालुका उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे, मालेगाव कॅम्प अग्रवाल पंचायत ट्रस्टचे अध्यक्ष कैलास अग्रवाल आणि श्री आॅल इंडिया श्वेतांबर स्थानकवासी जैन कॉन्फरन्सचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष शशीकुमार कर्नावट व अग्र सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष किरण अग्रवाल उपस्थित होेते. यावेळी किरण अग्रवाल यांच्या हस्ते अग्रसेन नागरी सहकारी पतसंस्थेच्या नूतन वास्तूत श्री अग्रसेनजी महाराज मूर्तीचे अनावरण करण्यात आले. प्रारंभी श्री अग्रसेन महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांतून काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये पाच विजेत्यांना बक्षिसांचे वाटप करण्यात आले. उरीतील शहीद जवानांसह दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. प्रास्ताविक व अहवालवाचन पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुसुदन अग्रवाल यांनी केले.
यावेळी किरण अग्रवाल म्हणाले, महाराष्ट्रातील पतसंस्थांनी आदर्श घ्यावा, असे येथील अग्रसेन नागरी पतसंस्थेचे काम आहे. सर्व पदाधिकारी व सदस्यांच्या सहयोगामुळेच संस्था आज या स्थानावर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तालुका उपनिबंधक संगमेश्वर बदनाळे, शशी कर्नावट, बद्रीलाल अग्रवाल, पतसंस्थेचे व्यवस्थापक अरुण अग्रवाल, मामकोचे ट्रस्टी भिका कोतकर यांचीही भाषणे झाली. सूत्रसंचालन जितेंद्र बोरा यांनी तर अरुण अग्रवाल यांनी आभार मानले.
कार्यक्रमास कैलास अग्रवाल, राकेश डिडवानिया, महेश पाटोदिया, दीपेश अग्रवाल, मधुसुदन काबरा, श्रीनिवास अग्रवाल, श्याम अग्रवाल, मीनादेवी अग्रवाल, नीता अग्रवाल, भटूलाल अग्रवाल, संतोष अग्रवाल, सुनीता निकम, सुशीला अग्रवाल यांच्यासह पतसंस्थेचे संचालक, कर्मचारी व समाजबांधव उपस्थित होते. (प्रतिनिधी)