खरी परीक्षा भाजपाच्या स्वबळाची!

By admin | Published: November 13, 2016 01:03 AM2016-11-13T01:03:54+5:302016-11-13T01:08:24+5:30

खरी परीक्षा भाजपाच्या स्वबळाची!

The true test of BJP! | खरी परीक्षा भाजपाच्या स्वबळाची!

खरी परीक्षा भाजपाच्या स्वबळाची!

Next

 किरण अग्रवाल

 

शिवसेनेने केलेल्या असहकार्यामुळे म्हणा अगर स्वपक्षाच्या प्रभाव वाढल्याच्या समजामुळे, भाजपाही यंदा जिल्ह्यातील सहापैकी पाच नगरपालिकांच्या निवडणुका स्वबळावर लढवते आहे. कोणताही खात्रीशीर ‘पॉकेट’ नसताना या पक्षाने केलेले हे धाडस महत्त्वाचे ठरणार असून, आगामी अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर परिणाम करू शकणाऱ्या या पालिका निवडणुकीत खरी परीक्षा त्यांचीच होऊ घातली आहे.नगरपालिका निवडणुकीसाठी ‘युती’ करण्याचा निर्णय शिवसेना, भाजपाच्या प्रदेशस्तरीय नेत्यांनी घेतला असला तरी नाशिक जिल्ह्यात हे पक्ष स्वतंत्रपणे लढत असल्याने त्यांच्या स्वबळाचीच परीक्षा होऊन जाणार आहे. शिवाय, नगरपालिकांतील निकाल यानंतर होऊ घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसह नाशिक महापालिकेसारख्या संस्थांच्या निवडणुकांसाठी पथदर्शक ठरणार आहेत.
शिवसेना, भाजपाच्या नेत्यांमध्ये वेळोवेळी होणारी ‘खडाखडी’ पाहता यंदा कोणत्याही निवडणुकीत ‘युती’ राहणार नाही, असे गृहीत धरूनच सर्वांनी तयारी चालविली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी ‘युती’ करायची की ‘आघाडी’ याबाबतचा निर्णय स्थानिक नेत्यांचा असेल असे सर्वच राजकीय पक्षांकडून सांगितले जात होते, त्यामुळेही ‘युती’ची आशा दुरावली होती. परंतु मुंबई मुक्कामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी ‘युती’चा निर्णय घोषित केल्याने किमान नगरपालिकांत तरी सोबतीने लढायची अपेक्षा व्यक्त होत होती. अर्थात, यासंदर्भात या दोन्ही पक्षांतर्फे स्थानिक नेत्यांचा निर्णय प्रमाण मानण्याची एक पळवाट कायम ठेवली गेल्याने अखेर त्यांचे स्वबळ अजमावणे निश्चित होऊन गेले आहे. नगरपालिका निवडणुकीच्या अर्ज माघारीअंती जे चित्र स्पष्ट झाले त्यात शिवसेना-भाजपा स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले. माघारीपूूर्वी या दोन्ही पक्षांनी ठिकठिकाणांच्या उमेदवारांना पक्ष व चिन्हाचे अधिकृत फॉर्म्स दिले होतेच; पण तरी शेवटच्या क्षणी काही जणांकडून ‘युती’ची अपेक्षा बाळगली जात होती, ती अर्ज माघारीनंतरच्या चित्राने फोल ठरली. जिल्ह्यातील सहापैकी पाच ठिकाणी म्हणजे भगूर, सिन्नर, सटाणा, मनमाड व नांदगाव नगरपालिकांमध्ये शिवसेना, भाजपा स्वतंत्रपणे रिंगणात आहे. येवला येथे ‘युती’ झाली असली तरी दोन जागांवर परस्परांत मैत्रीपूर्ण लढती होणार आहेत. त्यामुळे एकप्रकारे संपूर्ण जिल्ह्यातच सेना-भाजपाचा ‘कस’ लागणार असून, येथला निकाल अन्य निवडणुकांवर परिणामकारक ठरणार आहे.
महत्त्वाचे म्हणजे, भगूर, सिन्नर, नांदगाव या तीन ठिकाणी काँग्रेस व राष्ट्रवादी पक्ष ‘आघाडी’ने निवडणुकीला सामोरे जात आहे. त्यांच्यासमोर शिवसेना, भाजपा विभक्तावस्थेत आहे. यासंदर्भात म्हणायला भलेही असले म्हटले जात आहे की, काँग्रेस व राष्ट्रवादी पक्षाची अवस्था नाजुक असल्याने त्यांना या तीन ठिकाणी ‘आघाडी’खेरीज पर्याय नव्हता; पण ते जितके खरे तितकेच हे कुठे खोटे की, भाजपा-शिवसेनेची अवस्थाही त्यापेक्षा फार वेगळी नाही. आज केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता असल्याने आणि मोदी नाममाहात्म्यामुळे भाजपाला ठिकठिकाणी उमेदवार लाभले असले तरी पक्ष म्हणून या पक्षाची संघटनात्मक अवस्था तशी यथातथाच आहे. भाजपापेक्षा शिवसेना बऱ्यापैकी ग्रामीण भागात व नगरपालिका पातळीपर्यंत पोहोचली आहे. संघटनात्मक बळावर किंवा आजवर वेळोवेळी जनतेच्या प्रश्नांसाठी केलेल्या आंदोलन वगैरेमुळे लोकांसमोर स्थानिक नेतृत्व आलेले असल्यामुळे शिवसेनेने स्वबळ अजमावण्याचे धाडस केले असे म्हणता यावे; पण भाजपाचे काय? ‘ग्लोबल’ इमेजच्या चर्चांमुळे होऊ शकणाऱ्या लाभाखेरीज भाजपा उमेदवारांना अन्य कशाचा लाभ संभवावा हेच एक कोडे ठरावे. गेल्यावेळी भाजपाच्या संघटनात्मक निवडी झाल्या तेव्हा जिल्ह्याात सर्व ठिकाणी परिचित चेहरे नसल्याची ओरड खुद्द पक्षातच केली जात होती. सत्ता असल्याने ऐनवेळी येणारे बरेच जण सोबत येऊन जातात, परंतु निवडणुका जिंकण्यासाठी पक्षाची व कार्यकर्त्यांची म्हणून जी फळी असावी लागते ती या पक्षाकडे सर्वत्र नाही ही वास्तविकता आहे. त्यामुळे शिवसेना व भाजपाच्या स्वतंत्र लढाईत भाजपाला या निवडणुकीचा पेपर सोडवता येणे काहीसे अवघड ठरले तर आश्चर्य वाटायला नको.
भगूर, सिन्नर येथे शिवसेनेचे बऱ्यापैकी अस्तित्व आहे. या ठिकाणचे त्यांचे स्थानिक नेतृत्वही मातब्बर आहे. भगूरमध्ये खुद्द जिल्हाप्रमुख असतात तर सिन्नरमध्ये आमदारकी या पक्षाकडे आहे. त्यामुळे तेथील पालिका लढताना भाजपाची गरज वाटेनाशी झाली असेल हे समजता येणारे आहे. मात्र अन्य ठिकाणी या पक्षाचीही तशी स्थिती नाही. येवल्यात अन्य कोणत्याच पक्षाचे फारसे अस्तित्व उरलेले नाही. तेथे भुजबळ हाच एकमेव पक्ष चालतो. यंदा तर तेदेखील प्रत्यक्ष मार्गदर्शनाला नाहीत. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी स्वतंत्रपणे लढत आहेत. पण शिवसेनेकडे नाही म्हणायला वजनदार नेते असताना तेथे मात्र दोन जागांचा अपवादवगळता भाजपासोबत ‘युती’चा निर्णय घेतला गेला आहे. अन्य पालिकांसाठी तसे होऊ शकलेले नाही. नांदगावमध्ये माजी आमदार अनिल अहेर यांच्यामुळे काँग्रेसचे जसे स्वतंत्र अस्तित्व आहे तसे विद्यमान आमदारकीमुळे म्हणा अगर कशामुळे, राष्ट्रवादीनेही आपला मतदार तयार केला आहे. पण असे असताना ते ‘आघाडी’ने निवडणूक लढवत आहेत. ‘युती’तले पक्ष मात्र परस्परांत लढणार आहेत. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मूळ नांदगावचे असल्याने त्यांना स्वबळाची खात्री असावी हा भाग वेगळा, पण या त्यांच्या स्वतंत्र वाटचालीमुळे तेथेही भाजपा अडचणीत येण्याची शक्यता आहे.
मुळात, नाही म्हटले तरी ग्रामीण भागात पूर्वापार चालत आलेले राजकारण पाहता व स्थानिक स्तरावरील अर्थकारणाला चालना देणाऱ्या ठिकठिकाणच्या सहकारी संस्थांमधील सत्ताधाऱ्यांचे प्राबल्य लक्षात घेता जिल्ह्यात काँग्रेस व राष्ट्रवादीचा वरचष्मा राहिल्याने दिसून येते. अशाही स्थितीत आठपैकी तीन ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादीने ‘आघाडी’ केली आहे. यातील भगूर व सिन्नरमध्ये काँग्रेस नामशेष असल्यासारखी स्थिती आहे, त्यामुळे त्यांना आघाडीखेरीज गत्यंतर नव्हते. येवला व सटाण्यात राष्ट्रवादीकडे मातब्बर नेतृत्व असल्याने त्यांनी काँग्रेसचे लोढणे सोबत घेतले नाही. शिवसेनेचेही काही ‘पॉकेट्स’ आहेत. पण भाजपाचे तसे नाही. तरी हा पक्ष स्वबळावर रिंगणात आहे. याचा एकच अर्थ घेता यावा तो म्हणजे, एकतर सहयोगी शिवसेनेने त्यांना जमेतच धरले नसावे की ज्यामुळे स्वतंत्र लढण्याखेरीज भाजपापुढे पर्याय उरला नसावा; अथवा बदलती राजकीय हवा नगरपालिकेतही आपले नशीब बदलून देईल याचा या पक्षाच्या नेत्यांना विश्वास असावा. यापैकी काहीही असो, भाजपाचीच परीक्षा महत्त्वाची ठरणार आहे हे नक्की!

Web Title: The true test of BJP!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.