आरक्षणासाठी मराठा समाज किल्ले रायगडावरून फुंकणार रणशिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:12 AM2021-05-31T04:12:26+5:302021-05-31T04:12:26+5:30

नाशिक : स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधत खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणासंदर्भातील लढ्याविषयी काय भूमिका घेणार ...

The trumpet will be blown from the Maratha community fort Raigad for reservation | आरक्षणासाठी मराठा समाज किल्ले रायगडावरून फुंकणार रणशिंग

आरक्षणासाठी मराठा समाज किल्ले रायगडावरून फुंकणार रणशिंग

Next

नाशिक : स्वराज्याची राजधानी असलेल्या किल्ले रायगडावरून शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधत खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणासंदर्भातील लढ्याविषयी काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण मराठा समाजाचे लक्ष लागले आहे. त्यामुळे खा. संभाजीराजे यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा समाज रायगडाच्या पायथ्याशी जमणार असून नाशिक जिल्ह्यातूनही मराठा समाजाचे हजारो प्रतिनिधी ६ जूनला रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी कूच करणार आहेत.

नाशिक जिल्ह्यातील विविध मराठा संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची रविवारी (दि. ३०) सायंकाळी ऑनलाईन बैठक पार पडली. या बैठकीतच संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी रायगडावरून जी भूमिका घेतील त्याला समर्थन देत त्यानुसार आरक्षणासाठी पुढील लढा देण्याचा निर्धार करण्यात आला. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता लक्षात घेऊन मराठा समाजबांधवांनी ६ जूनपर्यंत रायगडावर पोहोचण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचनाही यावेळी करण्यात आल्या असून मिळेल त्या वाहनाने आणि मिळेल त्या रस्त्याने रायगडापर्यंतच पोहोचण्यासाठी गोपनीय पद्धतीने नियोजन करण्यास समाजप्रतिनिधींना सांगण्यात आले. या ऑनलाईन बैठकीला मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक करण गायकर, गणेश कदम, शिवाजी सहाणे, अमित नडगे, प्रा. उमेश शिंदे, तुषार जगताप यांच्यासह राजू देसले, संतोष माळोदे, सुनील भोर, संतोष घुमरे, दिलीप पाटील, रवींद्र खालकर, धीरज नेरे, नीलेश मोरे, योगेश कापसे, राम खुर्दळ, संजय फडोळ, संदीप शितोळे, विजय खर्जुल, आशिष हिरे, बंटी भागवत, योगेश पाटील, सुनील गुंजाळ, शरद तुंगार, माधवी पाटील, पूजा धुमाळ आदी उपस्थित होते.

----

कोट-

खासदार संभाजीराजे यांनी सरकारकडे दिलेल्या मागण्यांबाबत तत्काळ निर्णय व्हावा तसेच आरक्षणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सरकारला दिलेल्या तिन्ही पर्यायांवर सकारात्मक पाऊल उचलावे, असे आवाहन नाशिक जिल्हा सकल मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीने केले असून राज्याभिषेक सोहळ्यासाठी जिल्ह्यातील हजारो समाजबांधव मिळेल त्या साधनाने रायगडावर कूच करणार असल्याचाही निर्धार या बैठकीत करण्यात आला.

- करण गायकर, राज्य समन्वयक मराठा क्रांती मोर्चा

-----

सोशल मीडियावर ‘चलो रायगड’चा नारा

शिवराज्यभिषेक सोहळ्यासाठी अधिकाधिक संख्येने मराठा समाज रायगडावर एकत्र यावा तसेच रायगडावरून ठरणाऱ्या भूमिकेनुसार पुढील लढा उभा राहावा यासाठी ट्विटर, फेसबुक, व्हाॅट्स ॲप, इन्स्टाग्राम अशा समाजमाध्यमांद्वारे मराठा समन्वयकांनी मराठा समाजाची मानसिक तयारी करण्यासाठी ‘चलो रायगड’चा नारा दिला आहे

----

प्रसंगी राजकीय भूमिकेचीही तयारी

मराठा आरक्षणासाठी प्रसंगी राजकीय भूमिका स्पष्ट करून कोणत्याही पक्षाला न जुमानता स्वतंत्र राजकीय पक्ष स्थापन करावा व समाजाला न्याय देण्यासाठी तयार राहावे, असा सूरही या बैठकीत उमटला. त्यासाठी विविध क्षेत्रांत कार्यरत समाजप्रतिनिधींच्या वेगवेगळ्या आघाड्या स्थापन करण्याविषयीही चर्चा झाली.

---

बुधवारी पुन्हा बैठक

राज्याभिषेक सोहळा आणि मराठा समाजाचे संभाव्य आंदोलन याविषयी तपशीलवार नियोजन करून दिशा ठरविण्यासाठी बुधवारी (दि.२) औरंगाबाद रोडवरीव वरद लक्ष्मी लॉन्स येथे पुन्हा प्रत्यक्ष बैठक बोलाविण्यात आली आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी प्रमुख समन्वयकांच्या उपस्थितीत ही बैठक होणार असल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी दिली आहे.

Web Title: The trumpet will be blown from the Maratha community fort Raigad for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.