तुतारीचा आवाज जनतेच्या हाती, हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य
By संकेत शुक्ला | Published: February 23, 2024 04:37 PM2024-02-23T16:37:55+5:302024-02-23T16:39:44+5:30
तुतारीचे काय करायचे हे निवडणुकीत जनताच ठरवेल असा टोला राज्याचे वैदयकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.
संकेत शुक्ला, नाशिक : शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने तुतारी चिन्ह दिले आहे, नव्या चिन्हावर निवडणूक लढवताना त्या तुतारीचा आवाज जनतेवर अवलंबून असेल. त्या तुतारीचे काय करायचे हे निवडणुकीत जनताच ठरवेल असा टोला राज्याचे वैदयकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लगावला.
महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासाठी आले असता ते बोलत होते. याप्रसंगी त्यांनी दिवंगत मनोहर जोशी यांना श्रद्धांजली अर्पन करीत यांनी मुख्यमंत्री आणि लोकसभेचे अध्यक्ष म्हणून अत्यंत चांगले काम केल्याचे उद्गार काढले. राजेंद्र पाटणी यांच्या निधनाबद्दलही त्यांनी शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी दिलेल्या सुचनेनुसार वैद्यकीय शिक्षण प्रादेशिक भाषेत देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्याला लवकरच यश येईल. मात्र त्याची लगेच अंमलबजावणी होणार नाही असेही त्यांनी सांगीतले. कट प्रॅक्टिसवर नियंत्रणासाठी स्वतंत्र कायदे केले आहेत. कोणत्या डॉक्टरकडे जायचे याचे स्वातंत्र्य रुग्णांना आहे. त्यामुळे त्यांनी याबाबत विचार करावा असेही मुश्रीफ म्हणाले.
डॉक्टरांनी पुन्हा संपाची हाक दिल्याचे सांगीतल्यावर यासंदर्भात बैठक घेतली आहे. त्यांच्या मागणीनुसार दहा हजार रुपये वाढवून दिले आहेत. रुग्णांचे हाल होवू नये याची काळजी त्यांनी घ्यावी. हा संप लवकरच मिटेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मराठा आरक्षणासंदर्भात आम्ही दिलेला शब्द पाळला आहे. वेगळे टिकणारे आरक्षण दिले आहे. आता आंदोलन करू नका अशी विनंतीही केली आहे. त्यामुले जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.