पोलीस ठाण्यांचा कारभार सुधारण्याचा ‘विश्वास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2019 12:24 AM2019-03-14T00:24:13+5:302019-03-14T00:24:44+5:30
शहरातील कायदासुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता टिकवून ठेवण्याकरिता आणि सर्वसामान्यांना भयमुक्त वातावरणाची निर्मिती करून देण्यासाठी आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांचा कारभार सुधारण्याची ‘मोहीम’ आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हाती घेतली आहे.
नाशिक : शहरातील कायदासुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता टिकवून ठेवण्याकरिता आणि सर्वसामान्यांना भयमुक्त वातावरणाची निर्मिती करून देण्यासाठी आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांचा कारभार सुधारण्याची ‘मोहीम’ आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी हाती घेतली आहे. या मोहिमेचा शुभारंभ पुण्यनगरीच्या ‘पंचवटी’मधून त्यांनी बुधवारी (दि.१३) केला.
नाशिक आयुक्तालयाचा पदभार स्वीकारताच नांगरे पाटील यांनी नाशिक पुण्यनगरी असून, या शहरात गुन्हेगारांना राहता येणार नसल्याचा संकेत बोलून दाखविला होता. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याबरोबरच त्यांनी आपल्या धोरणात्मक आराखड्यानुसार धडक कारभाराला सुरुवात केली आहे.
नाशिककरांना भयमुक्त वातावरण निर्माण करून देणे हेच ध्येय असल्याचे नांगरे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे कायदासुव्यवस्थेशी कुठलीही तडजोड कोणीही करण्याचा प्रयत्न केल्यास ते खपवून घेतले जाणार नसल्याचे त्यांनी अप्रत्यक्षपणे आपल्या पहिल्या पंचवटी पोलीस ठाण्याच्या भेटीतूनच दाखवून दिले.