राममंदिरप्रश्नी सुप्रीम कोर्टावर विश्वास ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 02:09 AM2019-09-20T02:09:54+5:302019-09-20T02:12:19+5:30
राममंदिरप्रश्नी सर्वाेच्च न्यायालयात गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरू असून, सर्वाेच्च न्यायालय दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत आहे. असे असताना गेल्या काही दिवसांपासून राममंदिराच्या प्रश्नावरून काही वाचाळवीर उलट-सुलट वक्तव्य करून या प्रश्नात अडथळा निर्माण करीत असल्याचा आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला.
नाशिक : राममंदिरप्रश्नी सर्वाेच्च न्यायालयात गेल्या काही दिवसांपासून सुनावणी सुरू असून, सर्वाेच्च न्यायालय दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत आहे. असे असताना गेल्या काही दिवसांपासून राममंदिराच्या प्रश्नावरून काही वाचाळवीर उलट-सुलट वक्तव्य करून या प्रश्नात अडथळा निर्माण करीत असल्याचा आरोप करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला टोला लगावला. काश्मीरप्रश्नाच्या अनुषंगाने शरद पवार यांनी केलेले शेजारील राष्टÑांचे समर्थन आश्चर्यजनक असल्याची टीकाही मोदी यांनी यावेळी केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपानिमित्त तपोवनातील अटल मैदानात आयोजित विजय संकल्प सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. काही दिवसांपूर्वीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राममंदिराची पहिली वीट शिवसेना ठेवेल, असे वक्तव्य केले होते. ‘बडबोले’ नेत्यांची या संदर्भातील व्यक्तव्ये अडचणीत भर घालणारी असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
राममंदिरप्रश्नी प्रत्येक भारतीयाने सर्वोच्च न्यायालयावर विश्वास ठेवावा व वाचाळवीरांनी आपले तोंड बंद ठेवावे, असा सल्लाही त्यांनी दिला. जम्मू-काश्मीर मधील ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेऊन केंद्र सरकारने अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या देशाच्या जनतेच्या स्वप्नांची पूर्ती केली आहे. खुद्द जम्मू-काश्मीरमधील युवक, महिला या निर्णयाचे स्वागत करीत असताना शेजारील राष्टÑ या निर्णयाच्या आडून जम्मू-काश्मीरमध्ये अस्थिरता निर्माण करण्याचे प्रयत्न करीत असला तरी, काश्मीरमध्ये विकासाचे नवे पर्व सुरू करण्यापासून सरकारला आता कोणी रोखू शकत नाही, असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी काश्मीरच्या प्रश्नावरून कॉँग्रेस व राष्टÑवादी कॉँग्रेसच्या नेत्यांचे वर्तन दुर्भाग्यपूर्ण असल्याचे म्हटले.
देशाच्या सुरक्षिततेविषयी आपले सरकार कोणतीही तडजोड करणार नाही, त्यासाठी कितीही किंमत मोजावी लागली तरी चालेल असे सांगून पंतप्रधान मोदी यांनी कॉँग्रेसच्या तत्कालीन सरकारवर टीका केली. २००९ मध्ये लष्कराच्या जवानांसाठी एक लाख ८६ हजार बुलेट प्रुफ जॅकेट खरेदी करण्याची मागणी संरक्षण दलाने केली होती. सीमेवर आपले जवान बिना बुलेट पु्रफ जॅकेट घालून लढत असतानाही पाच वर्षे कॉँग्रेस व राष्टÑवादीच्या सरकारने जॅकेट खरेदी केले नाही. मात्र देशात भाजपाचे सरकार सत्तेवर येताच, बुलेट प्रुफ जॅकेटची खरेदी करण्यात आली आणि विशेष म्हणजे आंतरराष्टÑीय स्तरावरील बुलेट प्रुफ जॅकेटची निर्मिती भारताने केली. आज जगात शंभराहून अधिक देशात भारत बुलेट प्रुफ जॅकेटची निर्यात करीत असल्याचे गौरवोद्गार पंतप्रधान मोदी यांनी काढले.
केंद्रातील सरकारचे शंभर दिवस पूर्ण झाल्याने या शंभर दिवसांत गेल्या वेळेपेक्षा कठोर व वेगवान निर्णय घेण्यात आले असून, त्यावरून उर्वरित पाच वर्षे सरकारचा कारभार कसा असेल याचे स्पष्ट संकेत मिळत असल्याचे सांगून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, महाराष्टÑातील आजवरच्या अस्थिर राजकारणामुळे महाराष्टÑाची पिछेहाट झाली असून, ज्या वेगाने महाराष्टÑाने देशाला प्रगतीच्या दिशेने पुढे नेणे गरजेचे होते दुर्दैवाने ते होऊ शकले नाही. एकट्या मुंबईची चमक धमक सोडल्यास गावपातळीवरील गरीब जनता, शेतकरी, शेतमजूर हे अजूनही अविकसित राहिले व त्याला राज्याचे अस्थिर राजकारणच कारणीभूत असल्याचा आरोपही शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, रामदास आठवले, राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार, उच्च शिक्षणमंत्री विनोद तावडे, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, शिक्षणमंत्री आशिष शेलार, राज्यमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार रक्षा खडसे, सुजय विखे, आमदार एकनाथ खडसे, भाजपाच्या प्रभारी सरोज पांडे आदी उपस्थित होते.
शरद पवारांचे वक्तव्य दुर्दैवी
राष्टÑवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा उल्लेख करीत पंतप्रधान मोदी यांनी, पवार यांच्यासारखा अनुभवी नेत्याने जेव्हा काश्मीरच्या प्रश्नी शेजारच्या राष्टÑाच्या शासन व प्रशासनाची स्तुती केली त्याचे आपल्याला दु:ख वाटले असे सांगून, काश्मीरला मुख्य प्रवाहात आणण्याच्या निर्णयातही काही लोक राजकीय स्वार्थ शोधत असून, त्यांनी राजकीय द्वेषापोटी सरकारची व माझी स्वत:ची निंदा केली तरी हरकत नाही मात्र त्यांच्या वक्तव्याचा वापर शेजारच्या राष्टÑांना हत्यार म्हणून होणार नाही याची काळजी घ्यायला हवी, असा सल्लाही दिला.
मानाची पगडी
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ट पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. शिवछत्रपतींचे वंशज माजी खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते मानाची पगडी घालून पंतप्रधान मोदी यांचा सत्कार करण्यात आला.