जिल्हाधिकाऱ्यांच्या नियमांना विश्वस्तांकडूनच "खो"
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2021 11:09 PM2021-10-13T23:09:35+5:302021-10-13T23:10:05+5:30
नाशिक : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी नवरात्रोत्सवात सप्तश्रृंगी गडावर देवी मंदिरात दर्शनासाठी १० वर्षांच्या आतील मुलांना प्रवेश देण्यास मनाई केलेली असतानाही विश्वस्तांकडूनच जिल्हाधिकाऱ्यांचे नियम पायदळी तुडवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. विशेष म्हणजे मंगळवारपाठोपाठ बुधवारी(दि.१३) देखील एका विश्वस्ताने आपल्या दहा वर्षांच्या आतील मुलाला दर्शनासाठी सोबत नेल्याने नियम केवळ सामान्य भाविकांनाच लागू आहेत काय, असा संतप्त सवाल आता भाविकांकडून केला जात आहे. लागोपाठच्या या नियम उल्लंघनामुळे जिल्हाधिकारी नेमकी काय कारवाई करतात, याकडे भाविकांचे लक्ष लागून असून, विश्वस्तांनी मात्र याबाबत चुप्पी साधली आहे.

गेल्या ७ ऑक्टोबरपासून मंदिरे सुरू झाल्याने भक्तांना दर्शनाची आस लागली असताना शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करणाऱ्या
जिल्हाधिकाऱ्यानी भक्तांना जाचक अटी लावून भगवतीच्या दर्शनापासून वंचित ठेवल्याने अनेकांना नांदुरीला पहिल्या पायरीवर माथा टेकून ऑनलाइनमुळे माघारी फिरावे लागले. मात्र, या जाचक अटी सप्तश्रृंगी निवासनी देवी ट्रस्टच्या विश्वस्त मंडळाला लागू नाहीत का ? असा सवाल भक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना केला आहे. १० वर्षांच्या आतील बालकांना परवानगी नसताना भगवतीच्या महापूजेला विश्वस्ताच्या मुलांना प्रवेश कसा ? असा सवाल ट्रस्ट अध्यक्ष व व्यवस्थापन यांना भक्तांनी केला आहे.
सातव्या व आठव्या माळेला भगवतीच्या महापूजेचा मान दोन्ही विश्वस्तांना होता. या दोन्ही महापूजेला लहान मुलांची उपस्थिती भक्तांच्या निदर्शनास आली. बुधवारीदेखील आठव्या माळेच्या महापूजेला विश्वस्त यांच्या १० वर्षांच्या आतील मुलाच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. भाविकांनी कर्मचाऱ्यांकडे याबाबत प्रश्न उपस्थित केला असता त्यांनी चुप्पी साधली.
"त्या" विश्वस्तांना पदमुक्त करा!
सप्तश्रृंगी गडावर गेल्या सात दिवसांपासून शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करून नवरात्रोत्सव सुरू आहे. ६५ वर्षांवरील वयोवृद्धांना व १० वर्षांच्या आतील बालकांना दर्शनासाठी बंदी केल्यामुळे भक्तांमध्ये नाराजीचा सूर असताना ऑनलाइन दर्शन सुविधा सुरू केल्याने नाराजीत आणखीनच भर पडली. पहिल्या दोन तीन दिवशी भक्तांनी ऑनलाइनकडे पाठ फिरवल्यामुळे नाराजी दिसून आली होती. त्यात विश्वस्तांच्या मुलांना प्रवेश आणि भक्तांच्या मुलांना प्रवेश बंदी या नियमामुळे प्रशासन यंत्रणेवर नाराजी वाढली असून, विश्वस्तच जर शासनाचे नियम पायदळी तुडवत असतील तर या विश्वस्तांना या संस्थेवरून पदमुक्त करा आणि शासननियुक्त विश्वस्त मंडळ नियुक्त करा, असा सूर भक्तांनी लावला आहे.