पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2016 10:36 PM2016-06-04T22:36:19+5:302016-06-04T23:07:46+5:30

त्र्यंबकेश्वर : नागरिकांच्या मदतीसाठी समाजसेवकांचाही पुढाकार

Try to eliminate water shortage | पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न

पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न

Next

 त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहर व परिसरात सध्या पाण्याची टंचाई भासत असून, जो तो आपल्यापरीने पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहे. त्र्यंबक नगर परिषद, पालिका पदाधिकारी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट यांबरोबरच येथील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले वैद्यकीय व्यावसायिक डॉ. किरण कांबळे व डॉ. पंकज बोरसे यांनी पाण्याचे स्रोत श्रमदानाने प्रसंगी पदरमोड करून लोकांसाठी व भाविकांसाठी उपलब्ध करून दिले आहेत.
गेल्या वर्षाच्या तुलनेत त्र्यंबकेश्वरला अत्यंत कमी पाऊस (१४०० मि.मी.) झाला. त्र्यंबकेश्वर पाणीपुरवठा करणारे अहिल्या धरण, अंबोली धरण बेझे (गौतमी प्रकल्प) यातील पाणी कमी झाले. अहिल्या धरण तर पूर्ण सुकले आहे. साहजिकच त्र्यंबकला दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे. अंबोली धरणाचे पाणी जुलैपर्यंत पुरेल, असा अंदाज आहे.
पाणीटंचाई दूर करण्यासाठी त्र्यंबकेश्वरमधील समाजसेवकांनी आपला वैद्यकीय व्यवसाय सांभाळून त्र्यंबकेश्वरमधील प्रसिद्ध गंगाद्वार जवळील सूर्यकुंड गाळाने प्रचंड भरले होते. साहजिकच त्यातील पाणीही दूषित झाले होते. डॉ. बोरसे व डॉ. कांबळे या डॉक्टरांसोबत सुभाष कांबळे, गणेश पाटील, विजय गंगापुत्र, बाळासाहेब अडसरे, डॉ. मनोज गायकवाड, दिलीप माळी व विद्यमान उपनगराध्यक्ष संतोष कदम, मनोज काळे, आदिंनी गंगाद्वार परिसरातील वस्तीवरील स्थानिक रहिवाशांच्या सहकार्याने सूर्यकुंड पूर्णत: स्वच्छ केले. आज या कुंडात स्वच्छ व नितळ पाणी उपलब्ध झाले आहे. या कुंडाच्या पाण्याचा उपयोग स्थानिक रहिवासी यांना तर होतच आहे तथापि येणाऱ्या हजारो यात्रिकांना होत आहे, नव्हे त्यांची तृष्णा भागवित आहे.
गंगाद्वार परिसरातीलच मेटघर किल्ला, गंगाद्वारची मेट, विनायक खिंड मेट, सुपलीची मेट, महादरवाजाची मेट येथेदेखील पाणीटंचाईने उग्रस्वरूप धारण केले आहे. एक वेळेस गावात टॅँकर आदिंनी पाणीपुरवठा होऊ शकेल पण डोंगरावरील वस्त्यांवर पाणीपुरवठा करणे जिकिरीचे असते. मात्र या समाजसेवकांनी अन्य सेवाभावी संस्थांच्या मदतीने बाळासाहेब सावंत, मनोज काळे यांनी नाशिक येथील माहेश्वरी महिला मंडळाच्या सहकार्याने टॅँकरने पाणी उपलब्ध करून दिला.
या महिलांना जवळपास दोन कि.मी. पायपीट करावी लागत होती. या महिलांची पाण्यासाठी होणारी ससेहोलपट थांबविण्यासाठी डॉ. पंकज बोरसे, डॉ. किरण कांबळे यांनी तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांची कायमस्वरूपी नळपाणीपुरवठा योजना सुरू करण्यासाठी शासनाच्या जलस्वराज्य किंवा अन्य प्रकल्पातून राबविता येईल किंवा काय याबाबत भेट घेतली.
शहरात आज जल साठ्याचे खोलीकरण स्वच्छता करण्यासाठी त्र्यंबक नगर परिषद पालिका पदाधिकारी त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट आदिंनी अहल्या धरण, मुकुंद तलाव, बिल्वतीर्थ (त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट) या बरोबरच काही तीर्थे आदिंची खोली वाढविणे, सफाई करणे वगैरे उपक्रम हाती घेतले आहेत. हेतू एकच पाण्याचा साठा वाढविणे, जलस्त्रोत निर्माण करणे त्यातलाच हा प्रकार असून गंगाद्वार-ब्रह्मगिरी परिसरात पाण्याचे उद्भव निर्माण करणे, असलेल्या पाण्याच्या साठ्यात वाढ करणे वगैरेंचे काम या सामाजिक कार्यकर्त्यांनी श्रमदानाने व पदरमोड करून सुरू केले आहे.(वार्ताहर)

Web Title: Try to eliminate water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.