योगातून महिलांना सबला करण्याचा ध्यास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:32 AM2019-10-08T00:32:10+5:302019-10-08T00:32:28+5:30
अबलांना सबला बनविण्याचे स्वसंरक्षण वर्ग चालवणे, तसेच शिक्षिका म्हणून कार्यरत असताना संस्कृतीवर व्याख्याने देणे, महिलांचे पौरोहित्य वर्ग चालवणे अशा बहुविध पातळ्यांवर कार्य करीत योग विद्या धामचे संस्थात्मक पातळीवरील कार्य पौर्णिमाताई मंडलिक यांनी केले आहे.
अबलांना सबला बनविण्याचे स्वसंरक्षण वर्ग चालवणे, तसेच शिक्षिका म्हणून कार्यरत असताना संस्कृतीवर व्याख्याने देणे, महिलांचे पौरोहित्य वर्ग चालवणे अशा बहुविध पातळ्यांवर कार्य करीत योग विद्या धामचे संस्थात्मक पातळीवरील कार्य पौर्णिमाताई मंडलिक यांनी केले आहे. बालपणापासून राष्टसेविका समितीत जाऊन प्रशिक्षण घेतलेल्या पौर्णिमातार्इंनी तरुणपणी पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनी प्रशाला तसेच गरवारे कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणूनदेखील कार्य केले आहे. तसेच काही काळ पुणे विद्यापीठात भूगोलाच्या संशोधन सहायक म्हणूनदेखील कार्य केले. १९७८ सालापासून नाशिकमध्ये योगाभ्यास प्रशिक्षणास तसेच त्याच्या प्रचार-प्रसाराला प्राधान्य देण्यास प्रारंभ केला. त्याचदरम्यान राणी लक्ष्मीबाई भवनासह नाशिकच्या विविध शाळांमधील मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासही प्रारंभ करण्यात आला. तसेच राणी भवनात सर्वप्रथम महिलांना पौरोहित्याचे प्रशिक्षण देणारे वर्गदेखील त्यांनी १९८९ सालापासून सुरू केले. तसेच योग विद्या धामच्या राज्यभरातील ४२ शाखांमध्ये चालणाऱ्या परीक्षांच्या परीक्षक म्हणून आजदेखील त्या तितक्याच धडाडीने कार्यरत राहून हजारो साधकांना योगाभ्यासाचे धडे देत आहेत.