पोटात चाकू भोसकून जिवे मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 12:22 AM2018-09-26T00:22:24+5:302018-09-26T00:22:44+5:30
डीजीपीनगर गणपती मंदिर येथे झालेल्या वादाच्या कारणावरून युवकाच्या पोटात चाकू भोसकून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकरोड : डीजीपीनगर गणपती मंदिर येथे झालेल्या वादाच्या कारणावरून युवकाच्या पोटात चाकू भोसकून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डीजीपीनगर येथील राजेंद्र धोंडीराम घुगे याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘श्री’ विसर्जनाच्या मिरवणुकीनंतर हर्षल जगताप, विपुल जगताप, प्रसाद बागुल हे गणपती मंदिर उत्सव समिती मंडळाच्या कार्यकर्त्यांना शिवीगाळ करत होते. त्यानंतर नगरसेवक सतीश कुलकर्णी यांनी मध्यस्थी करून वादविवाद मिटवला. सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास योगेश धोंडीराम घुगे (४०) व राकेश पवार हे डीजीपीनगर येथील जॉगिंग ट्रॅकवर फिरण्यासाठी गेले होते. गणेश विसर्जनाच्या वेळी झालेल्या वादाच्या कुरापतीवरून संशयित हर्षल जगताप, विपुल जगताप, प्रसाद बागुल रा. डीजीपीनगर व जग्गू सांगळे रा. आंबेडकरनगर हे राकेश पवार याला मारण्यासाठी आले असता राकेश त्यांना बघून पळून गेला. त्यानंतर चौघा संशयितांनी योगेश घुगे याच्याशी वाद घालून शिवीगाळ करत जग्गू सांगळे याने योगेशच्या पोटात चाकू भोसकून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाशिकरोड परिसरात अशा प्रकारचे लहान-मोठे गुन्हे वाढत असून, नागरिक भयभीत झाले आहेत.