डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2019 11:05 PM2019-04-04T23:05:45+5:302019-04-04T23:06:40+5:30
नाशिक : शहरात दिवसेंदिवस घरफोडी आणि लूटमारीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना होलाराम कॉलनीत पुन्हा एका व्यापाऱ्याला डोळ्यात मिरचीची पूड टाकून लुटण्याचा प्रकार घडला आहे. सावरकरनगर भागात सोमवारी (दि. १) मद्यविक्री व्यावसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड टाकून भामट्यांनी लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, व्यावसायिकाने वेळीच आरडाओरड करीत प्रतिकार केल्याने लुटारूंनी धूम ठोकली. या प्रकरणी गंगापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सावरकरनगर भागात राहणारे संदीप भास्कर कोकाटे (४३) यांनी या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिसूझा कॉलनीतील वाइन शॉप बंद करून कोकाटे सोमवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास मद्यविक्रीतून आलेली सुमारे दोन लाख ८० हजारांची रोकड घेऊन घरी जात असताना ही घटना घडली. वाहन पार्किंगमध्ये लावून ते जिन्यातून घराकडे पायी जात असताना पाठीमागून तोंडास रुमाल बांधून आलेल्या तरुणांनी त्यांच्या हातातील पिशवी हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोकाटे यांनी वेळीच सावध होत आरडाओरड करीत प्रतिकार केला.दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवारी रात्री होलाराम कॉलनीत अशाच घटनेत एअरगनमधून गोळी झाडत लुटारूंनी औषध विक्रेता व्यापाऱ्यास लुटले होते. दरम्यान, या घटनेतील संशयितांनी पुन्हा असे धाडस केले असण्याचा संशय पोलिसांकडून व्यक्तकेला जात आहे.