गुन्हेगारी रोखण्यासाठी प्रयत्न गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 12:09 AM2017-09-23T00:09:11+5:302017-09-23T00:09:21+5:30
समाजात युवती व महिलांवर अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. व्यक्ती जन्मत: गुन्हेगार नसते, परंतु प्रवृत्ती त्यास गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे वळविते. समाजातील महिला, मुली सुरक्षित राहिल्या तरच समाज सुरक्षित राहील, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.
पंचवटी : समाजात युवती व महिलांवर अन्याय, अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे. व्यक्ती जन्मत: गुन्हेगार नसते, परंतु प्रवृत्ती त्यास गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे वळविते. समाजातील महिला, मुली सुरक्षित राहिल्या तरच समाज सुरक्षित राहील, असे प्रतिपादन पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल यांनी केले. पेठ रोडवरील फुलेनगर येथे पोलीस आयुक्तालय, महिला सुरक्षा शाखा यांच्या वतीने सुरक्षितता व स्वयंसंरक्षण आणि सायबर विषयक जनजागरणपर स्त्री जाणिवांचा वेध घेणाºया ‘आदिशक्ती जागर स्त्रीशक्तीचा’ या कार्यक्रमाचा शुभारंभ सिंगल यांच्या हस्ते करण्यात आला त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की, स्लम परिसरात गुन्हेगारी ही मोठी समस्या आहे. मुलांवर वेळीच चांगले संस्कार होण्यासाठी पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे. मुले काय करतात, कोणाबरोबर राहतात, त्यांनी चुकीचा मार्ग निवडला आहे का, याबाबत वेळीच चौकशी करणे गरजेचे आहे. मुलांना चांगले शिक्षण दिले तर त्यांची निश्चितच प्रगती होते व पुढे ते आपल्या कुटुंबाचे व्यवस्थित पालन-पोषण करतात. गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस प्रशासन सदैव सज्ज आहे. आपल्या परिसरातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी सर्वांनी पोलिसांना सहकार्य करून आपापली जबाबदारी समजावून घेतल्यास गुन्हेगारी रोखण्याकामी मदत होईल, असेही ते शेवटी म्हणाले. यावेळी पोलीस उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, पंचवटीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, बालविकास समन्वय विभागाचे गणेश कानवडे, पोलीस निरीक्षक आनंदा वाघ, नगरसेवक शांता हिरे, जगदिश पाटील, प्रा. सरिता सोनवणे, पूनम मोगरे, कविता कर्डक, रूपाली गावंड, शंकर हिरे, पद्माकर पाटील, मुकुंद गांगुर्डे, नितीन तुपलोंढे, बाळासाहेब शेलार, खर्डे आदी उपस्थित होते. बर्डेकर यांनी आभार मानले.