पूरपरिस्थितीचा गैरफायदा घेत डल्ला मारण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:19 AM2021-09-10T04:19:34+5:302021-09-10T04:19:34+5:30

नांदगाव : पुराचा मोठा धोका समता मार्गावरील वस्तीला झाला. घरात पाणी असताना कुटुंबातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व जण आपापल्या ...

Trying to take advantage of the flood situation | पूरपरिस्थितीचा गैरफायदा घेत डल्ला मारण्याचा प्रयत्न

पूरपरिस्थितीचा गैरफायदा घेत डल्ला मारण्याचा प्रयत्न

Next

नांदगाव : पुराचा मोठा धोका समता मार्गावरील वस्तीला झाला. घरात पाणी असताना कुटुंबातील लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्व जण आपापल्या परीने वस्तू वाचविण्याच्या प्रयत्नात असताना अज्ञात समाजकंटकांनी त्यांच्या परिस्थितीचा गैरफायदा घेऊन घरात शिरून बतावणी करत डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुनील भावसार यांच्या डोक्यावर लोखंडी गज मारल्याने ते गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

भावसार समता मार्गावर अनेक वर्षे राहतात. दुपारी दोन वाजता पुराचा भर असताना त्यांच्या लोखंडी दरवाजाची कडी काढून आत शिरलेल्या दोघांनी आम्हाला पोलिसांनी मदतीस पाठवले आहे. अशी बतावणी केली. त्यांच्या हातात दोर होता. संजय भावसार यांनी सांगितले की, आम्हाला मदत नको आहे. तुम्ही घरात कसे शिरलात, असा सवाल केल्यावर त्या दोघांनी भावसार यांचेवर हल्ला चढविला. त्यावेळी झालेल्या झटापटीत भावसार त्यांचा चुलतभाऊ, लहान मुलगा हे पुराच्या पाण्यात पडून वाहू लागले. त्यांचा लहान मुलगा पाण्यात पडून काही काळ दिसेनासा झाल्याने सर्व कुटुंब हादरले. परंतु सुदैवाने काही अंतरावर असलेल्या झाडाचा आधार मिळाल्याने तो मुलगा वाचला. दरम्यान सुनील भावसारची जखम मोठी असल्याने त्यांना डोक्याला चार टाके पडले.(०९ सुनील भावसार)

--------------------------

पुराच्या पाण्यामुळे मृतदेहावर पुन्हा अंत्यसंस्कार

बाजार समितीजवळ, परंतु लेंडी नदीजवळ असलेल्या स्मशानात बारकू शिंदे यांचा अंत्यविधी करण्यात आला. त्यावेळी पुराची लक्षणे नव्हती. अंत्यसंस्कार करून सगळे घराकडे परतले. चिता सर्व बाजूंनी पेटलेली होती आणि अचानक मोठा पूर आला. पुराचे पाणी स्मशानभूमीत शिरले. क्षणार्धात पाण्याचा लोंढा थेट चितेवर आदळल्याने सरणाची लाकडे कोसळली, विझली. शिंदे यांचा मृतदेह पाण्यातून पुढे गेला. खरे तर ते वाहूनच गेले असते. परंतु स्मशानभूमीच्या कोपऱ्यावर असलेल्या खांबाला अडकून राहिले. पाण्याचे लोंढे येत राहिले. पाण्याच्या त्या रौद्र स्वरूपात शिरण्याची कोणाचीच हिम्मत झाली नाही. हतबल होऊन परिवाराने ते दृश्य बघितले. त्यांच्या दु:खाला पारावार उरला नव्हता. कित्येक तासांच्या प्रतीक्षेनंतर पाणी ओसरले. खांबाला अडकलेले व अर्धवट अग्निसंस्कार झालेले तो मृतदेह कुटुंबीयांनी इतरांच्या मदतीने नवीन सरणावर ठेवले. पुन्हा एकदा अग्निसंस्काराचा विधी केला. भावनांवर नियंत्रण ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न परिवाराने केला. मात्र बारकू शिंदे यांचे ‘असे जाणे’ सर्वांच्या हृदयाला चटका लावून तर गेलेच; परंतु आयुष्यात कधी ही विसरता येणार नाहीत, अशा स्मृती मनाच्या कप्यात ठेवून गेले.

(०९ बारकू शिंदे)

090921\09nsk_10_09092021_13.jpg

०९ बारकू शिंदे, ०९ सुनील भावसार

Web Title: Trying to take advantage of the flood situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.