अखेर तुकाराम मुंढे यांची नाशिकमधून बदली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 01:25 AM2018-11-22T01:25:55+5:302018-11-22T01:26:22+5:30
महापालिकेचे वादग्रस्त आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर राज्य शासनाने बदली केली असून, त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती केल्याचे वृत्त आहे. मुंढे यांची बदली मात्र अन्यत्र नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे.
नाशिक : महापालिकेचे वादग्रस्त आयुक्त तुकाराम मुंढे यांची अखेर राज्य शासनाने बदली केली असून, त्यांच्या जागी उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नियुक्ती केल्याचे वृत्त आहे. मुंढे यांची बदली मात्र अन्यत्र नियुक्तीच्या प्रतीक्षेत ठेवण्यात आल्याचे वृत्त आहे. गेल्या नऊ महिन्यांपासून त्यांच्या बदलीसाठीचे प्रयत्न आणि अन्य चर्चा होत होत्या. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुंढे यांच्या पाठीशी उभे राहिल्याने आमदारांसह महापौर आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी हा प्रतिष्ठेचा प्रश्न करूनही उपयोग होत नव्हता. आता फडणवीस यांनीच वरदहस्त काढून घेतल्याने मुंढे यांची बदली झाल्याने नगरसेवक आणि अधिकाºयांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असला तरी मुंढे समर्थक नागरिकांची बैठक गुरुवारी सायंकाळी होणार असून, त्या माध्यमातून आंदोलनाची तयारीदेखील सुरू झाली आहे.
तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने अवघ्या नऊ महिन्यांत पुन्हा बदली केली आहे. गेल्या बारा वर्षातील मुंढे यांची ही अकरावी बदली आहे. त्यांची २०१६ पासूनची ही चौथी बदली आहे. आधी ते पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष, तत्पूर्वी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते आणि त्याही आधी सोलापूरचे जिल्हाधिकारी होते.
नाशकात महापालिकेने संमत केलेली अडीचशे कोटी रुपयांची कामे रद्द करण्यावरून पहिली ठिणगी पडली. १ मार्चपासून त्यांनी वार्षिक भाडेमूल्यात सुधारणा करताना हरित पट्ट्यासह पार्किंग आणि अन्य मोकळ्या जागांवर करवाढ केल्याने आंदोलने पेटली. नाशिक महापालिकेत मुंढे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्याची घटना घडली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्तक्षेपामुळे ही नामुष्की टळली असली तरी त्यांच्यावर बदलीची टांगती तलवार होती. त्यानंतर आता गेल्या दोन दिवसांपासून बदलीची चर्चा सुरू होती. अखेरीस ती खरी ठरली.
गमे नाशिकचे जावई
महापालिकेचे नूतन आयुक्त म्हणून येऊ घातलेले राधाकृष्ण गमे यांनी नाशिकमध्ये यापूर्वी निवासी जिल्हाधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त म्हणून कामकाज केले आहे. मूळचे अहमदनगरचे असलेले गमे हे नाशिकचे जावईदेखील आहेत.
नाशिक महापालिकेत ८ फेबु्रवारी रोजी आयुक्त म्हणून सूत्रे स्वीकारणाºया तुकाराम मुंढे यांचा कायद्यावर बोट ठेवून काम करण्याचा फटका लोकप्रतिनिधींना बसला आणि त्यातून त्यांच्या वादग्रस्त कारकिर्दीला सुरुवात झाली.