तुकाराम मुंढेंविरोधात संघर्ष ऐरणीवर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 01:45 AM2018-08-29T01:45:12+5:302018-08-29T01:45:27+5:30
करवाढीच्या मुद्द्यासह कार्यपद्धती आणि वागणुकीवरून भाजपाने लक्ष केलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठरावाला केवळ राजकीय पक्षच नव्हे तर शेतकरी आणि व्यावसायिक संघटनांचा पाठिंबा मिळवण्यासाठी यापक्षाचे पदाधिकारी सरसावले असून, अविश्वास ठराव हा नाशिककरांच्या हितासाठीच असल्याचे पटवून देण्यासाठी संपर्क मोहीम राबवित आहेत. भाजपाच्या या भूमिकेला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
नाशिक : करवाढीच्या मुद्द्यासह कार्यपद्धती आणि वागणुकीवरून भाजपाने लक्ष केलेले आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठरावाला केवळ राजकीय पक्षच नव्हे तर शेतकरी आणि व्यावसायिक संघटनांचा पाठिंबा मिळवण्यासाठी यापक्षाचे पदाधिकारी सरसावले असून, अविश्वास ठराव हा नाशिककरांच्या हितासाठीच असल्याचे पटवून देण्यासाठी संपर्क मोहीम राबवित आहेत. भाजपाच्या या भूमिकेला विविध संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
भाजपाच्या भूमिकेला पाठिंबा देणाऱ्यांमध्ये महाराष्टÑ राज्य शिक्षण संस्था महामंडळ, हॉकर्स व टपरीधारक कृती समिती, म्युनिसिपल कर्मचारी सेना, नाशिक जिल्हा फेरीवाला व टपरीधारक संघटना अशा विविध संघटनांनी पाठिंबा दिला असून, आणखी काही व्यावसायिक संघटना येत्या दोन दिवसांत अविश्वास ठरावाला पाठिंबा देणारे पत्र सादर करीत आहेत. भाजपाने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणला असून, सोमवारी (दि. २७) स्थायी समितीच्या पंधरा सदस्यांनी केलेल्या मागणीनुसार येत्या शनिवारी (दि.१ सप्टेंबर) विशेष महासभा बोलवण्यात आली आहे. मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव दाखल करताना भाजपाने मुंढे यांच्यावर हुकूमशाही आणि मनमानीचे आरोप केले असले तरी करवाढ हा कळीचा मुद्दा पुढे केला आहे. त्यामुळे नागरिक संघटनांचा पाठिंबादेखील मिळवण्यात येत आहे. महाराष्टÑ राज्य शिक्षण संस्था महामंडळाची बैठक दुपारी समर्थ मंगल कार्यालयात बैठक संपन्न झाली यावेळी माजी मंत्री विजय नवल पाटील, सूर्यकांत रहाळकर, गं. पा. माने, अण्णा पाटील, सूर्यकांत रहाळकर, कोंडाजीमामा आव्हाड यांच्यासह अन्य संस्थाचालक उपस्थित होते. महापालिका अधिनियमात धर्मादाय संस्थांना कर माफ आहे. शाळा हे सरस्वतीचे मंदिर असून, त्यामुळे करवाढ करू नये, त्याचप्रमाणे घरपट्टी अवास्तव वाढविल्यास त्याचा बोजा विद्यार्थ्यांच्या पालकांवर पडत असल्याने शाळा आणि मैदानावरील घरपट्टी वाढू नये, अशी मागणी करण्यात आली आहे.
हॉकर्स समितीने केली बडतर्फीची मागणी
सर्व पक्षीय हॉकर्स टपरीधारक कृती समितीने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अतिक्रमणाच्या विरोधात केलेल्या कारवाईमुळे अनेकांचे संसार उद््ध्वस्त झाले असून, त्यामुळेच त्यांना बडतर्फच केले पाहिजे, अशी मागणी केली आहे. महासभेत मुंढे यांच्याविरोधात सर्व पक्षियांनी मतदान करावे, अशी समितीच्या वतीने शिवाजी भोर, शशीभाई उन्हवणे, सय्यद युनूस यांनी केली आहे. नाशिक जिल्हा फेरीवाला व टपरीधारक संघटनेच्या वतीनेही संदीप जाधव, नवनाथ ढगे, सय्यद युनूस यांच्यासह अन्य त्यांना पाठिंबा दिला आहे.
मनपा कर्मचा-यांच्या सेनाही सरसावल्या
महापालिकेतील काही कर्मचारी संघटनांनी काही दिवसांपूर्वी संपाची हाक दिली होती. मात्र, त्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर सकारात्मक चर्चा झाल्याचा दावा केला होता. मात्र आता म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेनेचे प्रवीण तिदमे आणि बाल्मीकी मेघवाळ मेहतर समाज संघर्ष समितीचे सुरेश मारू यांनीदेखील आयुक्तांवर दहशत निर्माण केल्याचा आरोप केला असून, नगरसेवकांनी अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान करण्याची मागणी करण्यात आली आहे. तुकाराम मुंढे यांच्या बचावासाठी मोहीम सुरू असतानाच भाजपानेदेखील विविध संघटनांना करवाढीचा बोजा समजावून सांगत त्यांचा पाठिंबा मिळवला आहे. महापौर रंजना भानसी, सभागृह नेता दिनकर पाटील, गटनेता संभाजी मोरुस्कर, उद्धव निमसे यांच्यासह अनेकांनी अवास्तव करवाढ लादली जात असल्याने नागरिकांवर अन्याय होत असल्याचे राजकीय पक्षांना व विविध संघटनांना पटवून दिले.
नाशिक : महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना जेमतेम बोटावर मोजण्याइतके महिने झाले असताना सत्ताधारी भाजपा सरकारने त्यांच्याविरोधात षडयंत्र रचला आणि अविश्वास ठराव पारित करण्यासाठी महासभा बोलविली; मात्र या महासभेच्याच दिवशी महापालिकेच्या मुख्यालयावर मुंडे यांच्या समर्थनार्थ ‘वॉक फॉर कमिशनर’, असा मोर्चा धडकणार आहे. महापालिकेच्या इतिहासात आयुक्तांच्या समर्थनार्थ महापालिकेच्या द्वारावर येणारा नाशिककरांचा हा एकमेव मोर्चा ठरेल. विविध सामाजिक संघटनांसह, डाव्या, पुरोगामी संघटना व नाशिककरांनी सोशल मीडियावर उभारलेल्या चळवळीअंतर्गत मंगळवारी (दि.२८) संध्याकाळी बैठक पार पडली. महापालिकेची सूत्रे हाती घेऊन मुंढे यांना सात महिन्यांचा कालावधी झाला आहे.
मुंढे यांना नाशिकच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाशिकला पाठविले; मात्र सत्ताधारी भाजपा मुंढे यांच्याविरोधात का? असा
सवाल बैठकीत उपस्थित करण्यात आला. फडणवीस यांनी दत्तक घेतलेल्या नाशिकचा विकास भाजपाच्या लोकप्रतिनिधींना नकोसा का वाटतो? असा संतप्त सवालही उपस्थित नाशिककरांनी विचारला.
‘आम्ही नाशिककर’ या नात्याने जनआंदोलनाचे रणशिंग सोशल मीडियाच्या माध्यमातून फुंकण्यात आले आहे. महासभेच्या दिवशी मुुख्यालयावर ‘वॉक फॉर कमिशनर’ असा मोर्चा काढण्याचा निर्णय बैठकीत घेतला गेला. ‘भ्रष्टाचारमुक्त महापालिके साठी हवे ‘तुकाराम’...., ‘आम्ही नाशिककर, आम्हाला हवे मुंढे’, ‘जानता हैं एक एक बच्चा मुंढे सहाब हैं सच्चा’, ‘गुंडेविरुद्ध तुकाराम मुंढे’, ‘स्मार्ट शहरासाठी हवे स्मार्ट मुंढे’ अशा घोषणा यावेळी निश्चित करण्यात आल्या. याप्रसंगी हंसराज वडघुळे, राजू देसले, योगेश कापसे, जितेंद्र भावे,समाधान भारतीय, निशिकांत पगारे, भुषण काळे आदि उपस्थित होते.
२९ तारखेपासून शहरात आंदोलन
२९ तारखेपासून शहरात मुंढे यांच्या समर्थनार्थ अन् सत्ताधारी भाजपाच्या निषेधार्थ शहरात विविध भागांमध्ये आंदोलन केले जाणार आहे. दिवसभर राजीव गांधी भवनसह विविध चौकांमध्ये सर्वसामान्य नाशिककर काळ्याफिती लावून आंदोलन करणार आहे. यावेळी मुंढे यांची नाशिकला गरज का? याबाबत पथनाट्याच्या माध्यमातून प्रबोधनही करण्यात येणार असल्याचे बैठकीत सांगितले. गांधीगिरी स्टाइलनेही आंदोलन केले जाणार आहे. सलग तीन दिवस आंदोलन शहरात सुरू राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले
मी एक गृहिणी म्हणून बैठकीला हजेरी लावली. मुंढे यांचे स्वच्छ कायदेशीर कार्य शहराच्या विकासासाठी गरजेचे आहे. त्यांची बदली करून शहराचे प्रश्न सुटण्याऐवजी अधिक जटिल होतील, हे सत्ताधाऱ्यांनी लोकप्रतिनिधी या नात्याने लक्षात घ्यावे, आपले राजकारण बाजूला ठेवावे.
-वर्षा सोमण, गंगापूररोड
नाशिककर म्हणून मुंढे यांना समर्थन करणार आणि सत्ताधाºयांशी भांडणार. नाशिकच्या विकासाची दूरदृष्टी मुंढे यांच्याकडे आहे. त्यामुळे त्यांची बदली करून नाशिकच्या विकासाला खीळ ठोकू देणार नाही. -अभिजित गोसावी, तरुण
मुंढे यांच्या स्वरूपात एक चांगला व कर्तव्यदक्ष प्रामाणिक अधिकारी महापालिकेला लाभला आहे. त्यामुळे मुंढे यांची वाटचाल खडतर जरी असली तरी ती नाशिककरांसाठी चांगली आहे. भ्रष्टाचारमुक्त मनपा प्रशासनासाठी मुंढे यांची गरज आहे. -नंदिता चव्हाथे, पाथर्डीफाटा
सोशल मीडियावर मुंढे यांच्या समर्थनार्थ जनआंदोलन उभे राहिले आहे. नाशिककारांना मुंढे हवे असून, राजकारण्यांना ते नकोसे वाटतात कारण त्याच्यात त्यांना त्यांचे नुकसान दिसते. लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने वागावे अन्यथा त्यांना नाशिककरांच्या रोषाचा सामना करावा लागेल. - नितीन जमदाडे, सिडको
महापालिके सह नाशिककरांवर मुंढे यांनी प्रभाव पाडला आहे. त्यांच्या पारदर्शक कारभारामुळे राजकारण्यांचे धाबे दणाणले आहे. सामान्य नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा अधिकाºयांकडून प्रयत्न होऊ लागला आहे, तो केवळ मुंढे यांच्यामुळेच. महापालिका प्रशासनासह त्यांनी लोकप्रतिनिधींनाही शिस्त लावली आहे. सात महिन्यांमध्ये त्यांनी आपल्या प्रभावशाली कार्याची झलक नाशिककरांना दाखवून दिली आहे. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ नाशिककरांनी रस्त्यावर उतरावे.
‘सोशल समर्थन चळवळ’
नाशिककरांनी मुंढे यांच्या समर्थनार्थ जनजागृती पर ‘सोशल समर्थन चळवळ’ सुरू केली आहे. मुंढे यांच्या समर्थनार्थ नाशिककर सरसावले असून, सोशल मीडियाच्या माध्यमातून ‘वुई सपोर्ट मुंडे’ अशा हॅशटॅगवर नगरसेवकांनाच ट्रोल केले जात आहे. भ्रष्टाचार थांबल्यानेच अस्वस्थ झालेल्या नगरसेवकांनी मुंढे हटाव मोहीम हाती घेतल्याचा आरोप करण्यात येत आहे.