तुकाराम मुंढे १५ दिवसांच्या रजेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2018 12:56 AM2018-05-26T00:56:47+5:302018-05-26T00:56:47+5:30
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे १५ दिवसांच्या रजेवर चालले असून, आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन हे शनिवारी (दि.२६) स्वीकारणार आहेत. सिडकोतील अतिक्रमणविरोधी कारवाईला द्यावी लागलेली स्थगिती आणि त्यापाठोपाठ आनंदवल्ली शिवारातील ग्रीनफिल्ड लॉन्सवरील कारवाईबाबत न्यायालयात मागावी लागलेली माफी यामुळे आयुक्त १५ दिवसांच्या रजेवर चालले असल्याची चर्चा सुरू झाली असताना, आयुक्तांनी मात्र, आपला रजेचा अर्ज पूर्वीच दिला असून, या घटना- घडामोडींशी त्याचा काही संबंध नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे.
नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे हे १५ दिवसांच्या रजेवर चालले असून, आयुक्तपदाचा कार्यभार जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन हे शनिवारी (दि.२६) स्वीकारणार आहेत. सिडकोतील अतिक्रमणविरोधी कारवाईला द्यावी लागलेली स्थगिती आणि त्यापाठोपाठ आनंदवल्ली शिवारातील ग्रीनफिल्ड लॉन्सवरील कारवाईबाबत न्यायालयात मागावी लागलेली माफी यामुळे आयुक्त १५ दिवसांच्या रजेवर चालले असल्याची चर्चा सुरू झाली असताना, आयुक्तांनी मात्र, आपला रजेचा अर्ज पूर्वीच दिला असून, या घटना- घडामोडींशी त्याचा काही संबंध नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले आहे. गेल्या तीन-साडेतीन महिन्यांपासून आपल्या धडाकेबाज कारवाईमुळे आयुक्त तुकाराम मुंढे चर्चेत आले आहेत. गेल्या चार-पाच दिवसांपासून सिडकोतील अनधिकृत बांधकामे हटविण्याचा प्रश्न तापण्यास सुरूवात झाली असताना महापालिकेने मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर बॅकफूटवर येत शुक्रवारी (दि.२५) वाढीव बांधकामांवर मार्किंगचे काम थांबविले. त्यानंतर, शुक्रवारीच उच्च न्यायालयात आनंदवल्ली शिवारातील ग्रीनफिल्ड लॉन्सवरील संरक्षक भिंतीचे बांधकाम स्थगिती आदेश असतानाही पाडण्यात आल्याने उच्च न्यायालयाने महापालिकेला फटकारले आणि सदर बांधकाम पुन्हा बांधून देण्याचे आदेशित केले. या चुकीबद्दल आयुक्तांना माफी मागावी लागली. लागोपाठच्या या घटनाघडामोडी घडत असतानाच शुक्रवारी आयुक्त मुंढे हे पंधरा दिवसांच्या रजेवर जाणार असल्याची वार्ता आली. त्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात विचारणा केली असता, त्यांनी त्यास दुजोरा देत येत्या शनिवारी (दि.२५) जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे, मुंढे यांना रजेवर पाठविले गेल्याची चर्चा सुरू झाली. याबाबत खुद्द तुकाराम मुंढे यांच्याशीच संपर्क साधला असता, त्यांनी या चर्चा व्यर्थ असल्याचे सांगत आपण रजेचा अर्ज यापूर्वीच दिला असल्याचे स्पष्ट केले. हवे तर रजेच्या अर्जावरील तारीख बघून घ्या. आपल्या रजेचा संबंध या घटनाघडामोडींशी लावला जाऊ नये, असेही त्यांनी सांगितले.