तुकाराम मुंढे, महेश झगडे आता चर्चेच्या केंद्रस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:15 AM2021-04-24T04:15:03+5:302021-04-24T04:15:03+5:30

नाशकातील दुर्घटना: आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याची गरज लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक : शहरात आधीच आरोग्य सेवेची आणीबाणी आणि त्यातच ...

Tukaram Mundhe, Mahesh Jhagde are now at the center of the discussion | तुकाराम मुंढे, महेश झगडे आता चर्चेच्या केंद्रस्थानी

तुकाराम मुंढे, महेश झगडे आता चर्चेच्या केंद्रस्थानी

Next

नाशकातील दुर्घटना: आरोग्य व्यवस्था सक्षम करण्याची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क,

नाशिक : शहरात आधीच आरोग्य सेवेची आणीबाणी आणि त्यातच डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळतीची दुर्घटना यामुळे आता पुन्हा एकदा प्रशासकीय अव्यवस्थेची चर्चा होऊ लागली आहे. विशेष म्हणजे या चर्चेच्या केंद्रस्थानी महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाचे माजी सचिव जिल्हाधिकारी महेश झगडे यांच्या नावाची चर्चा होऊ लागली आहे. यापैकी महेश झगडे यांची डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयातील ऑक्सिजन गळती दुर्घटनाप्रकरणी चौकशी समितीचे प्रमुख म्हणून, तर नाशिकमधील खासगी आणि शासकीय आरोग्य व्यवस्थेला सक्षम करण्यासाठी तुकाराम मुंढे यांनाच परत आणावे, अशी मागणी काहीजण करीत आहेत.

नाशिक शहरात कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात अनेक उणिवा लक्षात आल्या आहेत. शहरात महापालिकेची न्यू बिटको आणि डॉ. झाकीर हुसेन ही दोन रुग्णालये अत्यंत चांगली असलीतरी त्यांना मर्यादा असल्याने खासगी रुग्णालयात धाव घ्यावी लागते. परंतु आज नाशिकमध्ये बेड आहे, तर ऑक्सिजन नाही आणि ऑक्सिजन आहे, तर बेड नाही अशी भीषण अवस्था आहे. शिवाय जनरल बेडही सहजासहजी मिळत नाही. रेमडेसिविर तर दुरापास्त झाले असून, मोठ्या प्रमाणात काळाबाजार होत आहे. या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना बेड, ऑक्सिजन आणि

रेमडेसिविरसारख्या सुविधा हव्या असतील तर तुकाराम मुंढे यांना महापालिका आयुक्त म्हणून परत आणा, अशी सोशल मीडियावर चळवळ सुरू झाली आहे. याशिवाय आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ता जितेंद्र भाभे यांनीही तशी मागणीही शासनाकडे केली आहे.

दरम्यान, डॉ. झाकीर हुसेन दुर्घटनेची चौकशी योग्यरीतीने व्हावी यासाठी

अन्न आणि औषध प्रशासनाच्या कामाचा अनुभव असलेल्या माजी सचिव महेश झगडे यांची उच्चस्तरीय चौकशी समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे माजी आमदार जयंत जाधव यांनी केली आहे.

इन्फो...

म्हणून व्हावी झगडे यांची नियुक्ती...

ऑक्सिजन गळती दुर्घटना चौकशी समितीच्या अध्यक्षपदी असलेले विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे हे गैर नसले तरी त्यांच्या समितीत असलेले अन्य सदस्य महापालिकेसारख्या यंत्रणेबाबत चौकशी निरपेक्षपणे होण्याविषयी शंका आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचा आणि नाशिकमध्ये कामकाजाचा अनुभव असलेल्या महेश झगडे यांची नियुक्ती करावी, अशी भावना माजी आमदार जाधव यांनी व्यक्त केली आहे.

इन्फो

ऑक्सिजन गळती दुर्घटनाप्रकरणी चौकशी समिती म्हणून सध्या नियुक्त विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिक महापालिकेत आयुक्त म्हणून नुकतेच काम केले आहे. त्यामुळे या चौकशी समितीच्या अध्यक्षपदी माजी सचिव महेश झगडे यांची नियुक्ती करावी, अशी मागणी डाव्या लोकशाही आघाडीचे तानाजी जायभावे, कॉ. राजू देसले आणि शशिकांत उनव्हणे यांनी केली आहे.

Web Title: Tukaram Mundhe, Mahesh Jhagde are now at the center of the discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.